पाटणा: बिहारमधील अररियामध्ये एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. पत्नीने शेजाऱ्यासोबत लग्न केल्यामुळे पतीला प्रचंड मानसिक धक्का बसला. त्याने सोशल मीडिया साइटवर लाइव्ह व्हिडिओ करून विष पिऊन आत्महत्या केली. लाइव्ह करताना त्याने न्याय मिळावा, असे सांगितले.

सिमराहा येथील रहिवासी हेमंत याच्या पत्नीने शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत लग्न केले होते. हा हेमंतसाठी मोठा मानसिक धक्का होता. त्याने सोशल मीडिया नेटवर्किंग साइटवर लाइव्ह व्हिडिओ केला आणि विष प्यायला. त्याचवेळी त्याने मला न्याय दिला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. माझ्या पत्नीला राकेश साह नावाच्या तरुणाने फूस लावून तिच्यासोबत लग्न केले. हे मी सहन करू शकत नाही. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूनंतर तरी मला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, असे त्याने लाइव्ह व्हिडिओदरम्यान सांगितले.

लाइव्ह व्हिडिओ बघितल्यानंतर काही जणांनी त्याच्या घराकडे धाव घेतली. तसेच पोलिसांनाही माहिती दिली. पोलीस आल्यानंतर घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी हेमंत हा बेशुद्धावस्थेत पडला होता. त्याला तातडीने अररिया येथील रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर कटिहार मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

पत्नी आणि तरूण फरार

पतीच्या मृत्यूची माहिती मिळताच पत्नी आणि प्रियकर फरार झाले. तर हेमंतचा मृतदेह कटिहारहून सिमराहा येथे आणण्यात आले. हेमंत हा दिल्लीत राहत होता. त्याची पत्नी मुन्नी हिने शेजारी राहणाऱ्या राकेशसोबत लग्न केले आहे, अशी माहिती त्याला मिळाली. त्यानंतर तो घरी परतला. पत्नीचे मन वळवण्याचे त्याने खूप प्रयत्न केले. मात्र, ती पुन्हा घरी यायला तयार झाली नाही. त्यामुळे त्याला मोठा मानसिक धक्का बसला, अशी माहिती समजते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here