सांगली: सांगलीतील कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरू असताना पळालेले दोन्ही कैदी नऊ दिवसांच्या शोधानंतर पोलिसांच्या हाती लागले. कैदी राजू कोळी याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी मंगळवारी कराडमधून अटक केली, तर रोहित जगदाळे (दोघेही रा. गवळी गल्ली, सांगली) याला शहर पोलिसांनी सोमवारी रात्री सांगलीतून अटक केली. हे दोघे २७ सप्टेंबरला पहाटे एका शिक्षण संस्थेच्या इमारतीमधील कोव्हिड सेंटरमधून पळाले होते. विशेष म्हणजे पळून जाताच या दोघांनी एक कार चोरली होती.

वाचा:

याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली शहर पोलिस ठाण्याकडील रेकॉर्डवरील सराईत चोरटे राजू कोळी आणि रोहित जगदाळे यांना जबरी चोरीच्या गुन्ह्यात १९ सप्टेंबर रोजी अटक झाली होती. कारागृहात दाखल करताना त्यांची करोनाची चाचणी घेण्यात आली. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी शहरातील एका कोव्हिड सेंटरमध्ये दाखल केले होते. २७ सप्टेंबर रोजी पहाटे पाचच्या सुमारास या दोघांनी आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांची नजर चुकवून कोव्हिड सेंटरमधून पळ काढला होता. करोनाबाधित कैदी पळल्याने शहरात खळबळ उडाली होती. शहरातील सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. पसार झालेल्या दोन्ही आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पाच पथके रवाना झाली होती. तर कैदी पळून जाताना बंदोबस्तास असलेल्या गार्ड ड्युटी पोलिसांवर पोलिस अधीक्षकांनी बदलीची कारवाई केली.
नऊ दिवसांच्या शोधानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि सांगली शहर पोलिसांनी आरोपी राजू कोळी आणि रोहित जगदाळे यांना पुन्हा अटक केली. विशेष म्हणजे कोव्हिड सेंटरमधून पळून जाताच राजू कोळी आणि रोहित जगदाळे या दोघांनी सांगली शहरात रस्त्याकडेला पार्क केलेली एक कार लंपास केली. यानंतर ते कर्नाटकात गेले होते. काही दिवस बाहेर थांबल्यानंतर रोहित जगदाळे सांगलीतील घरी आला, तर राजू काळे हा कराडमधील नातेवाईकांकडे गेला होता.

याची माहिती मिळताच पोलिसांनी दोघांना अटक केली. ताबा घताच त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. करोना चाचणीसाठी स्वॅब प्रयोगशाळेत पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, सांगली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, बिरोबा नरळे, संतोष गळवे, विक्रम खोत आणि झाकीर काझी यांच्या पथकाने ही कारवाई करत कैद्यांना जेरबंद केले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here