म.टा. प्रतिनिधी, नगरः कर्तव्यावर असताना करोनामुळे मरण पावलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांची घोषणा सरकारने केली होती. त्यानुसार नगर जिल्ह्यात मृत झालेल्या तीन पोलिसांच्या कुटुंबियांना या मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते या धनादेशांचे वितरण झाले.

सहायक फौजदार अबासाहेब गारुडकर (पोलिस मुख्यालय), संजय पोटे (सोनई) व संतोष शेळके (पारनेर) या तीन पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला. सरकारने केलेल्या घोषणेनुसार त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास लाखांची मदत देण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एप्रिल महिन्यातच ही घोषणा केली होती. करोना संकटात सुरवातीपासून पोलिसांनी जीव धोक्यात घालून काम केले. एप्रिल महिन्यात कडक लॉकडाउन सुरू होता. त्यामुळे पोलिसांना बंदोबस्ताचा जास्त ताण होता. गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसच पुढे असल्याने त्यांना करोनाची लागण होत असल्याचे आढळून आले. करोनायोद्धा म्हणून काम करणाऱ्या पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सरकाराने हा निर्णय घेतला. गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

करोनाची साथ पसरलेली असताना पोलीस जीव धोक्यात घालून काम करत आहेत. अशावेळी एखाद्या पोलिसाचा करोनाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. पोलिसांसाठी अशी मदत जाहीर केल्यानंतर अशीच मदत अन्य घटकांसाठीही लागू करावी, अशी मागणी होऊ लागली. अनेकांकडून विमा उतरविण्याचीही मागणी होऊ लागली. त्यातील काही मागण्या अद्याप प्रलंबित असल्या तरी पोलिसांसंबंधी केलेल्या घोषणेला मात्र सरकार जागले असल्याचे यावरून दिसून येते. नगर जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना ही रक्कम मिळाली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here