जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्यानंतर सिव्हिल इंजिनिअर अनंत करमुसे यांना आव्हाड यांच्या बंगल्यावर १५ ते २० जणांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता. या मारहाणीनंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली होती. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली होती. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी लावून धरली होती. या प्रकरणी तीन पोलिसांवर कारवाई झाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी जितेंद्र आव्हाड यांना अटक कधी होणार, असा सवाल उपस्थित केला आहे.
‘ठाकरे सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच्या १५ पोलीस अंगरक्षकांच्या माध्यमातून इंजिनिअर अनंत करमुसेचं अपहरण केलं, घरी आणलं आणि मारहाण केली. या प्रकरणी ठाकरे सरकारनं सहा महिन्यांनी तीन पोलिसांना अटक केली आहे. आतापर्यंत नऊ लोकांना अटक झाली. पण जितेंद्र आव्हाडांना कधी अटक होणार?,’ असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकरणात तीन पोलिसांना अटक केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिली आहे. हे सर्व कर्मचारी पोलीस मुख्यालयातील असून बॉडीगार्ड आहेत. यातील दोन पोलीस मुंबईचे तर एक ठाण्यातील आहे. त्यांना जामीन मिळाला असल्याचंही एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times