एनडीएच्या जागावाटपानुसार जेडीयूला १२२ आणि भाजपला १२१ जागा देण्यात आल्या आहेत. जेडीयूला एकापेक्षा जास्त जागा देण्याचा अर्थ म्हणजे नितीशकुमार यांचा पक्ष हा आपला मोठा भाऊ असल्याचं भाजपने मान्य केलं आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश यांनी महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख ( ) यांच्यासारखी चूक केली नाही. मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षे राहील, असं आश्वासन भाजपने दिलं होतं असा दावा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकार स्थापन करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलणी झाली होती, असा दावा उद्धव ठाकरे आणि पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. मात्र, याचे कोणतेही पुरावे शिवसेनेला सादर करता आले नाही. यामुळे शिवसेना भाजपपासून वेगळी झाली आणि राष्ट्रवादी, कॉंग्रेसबरोबर सत्ता स्थापन केली. मात्र, उद्धव ठाकरे यांची चूक बिहारमध्ये नितीशकुमार यांनी केली नाही.
पंतप्रधानच नव्हे तर गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही बिहार निवडणुकीत नितीशकुमार हेच एनडीएचा चेहरा असतील, असं विविध मंचावरून जाहीरपणे सांगितलं आहे. हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे बिहारमधील रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष. हा पक्ष एनडीएतून बाहेर पडला असून स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी केली आहे. यामुळे निवडणुकीनंतर अधिक जागा मिळाल्या तर भाजप नितीशकुमार यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारणार की नाही, यावरून संभ्रम निर्माण झाला होता. पण बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी हा संभ्रम दूर केला आहे. नितीशकुमार हेच एनडीएचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील असं त्यांनी स्पष्ट केलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जैस्वाल आणि बिहारचे प्रभारी भूपेंद्र यादव यांनीही याचा पुनरुच्चार केला. कुणी कितीही जागा जिंकल्या तरी एनडीएची सत्ता आल्यास नितीशकुमार हेच मुख्यमंत्री होतील, असं ते म्हणाले.
भाजप नेत्यांच्या या घोषणेनंतर नितीशकुमार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. कारण आता मुख्यमंत्रीपदासंदर्भात कुठलाही पेच राहिलेला नाही. तसंच निवडणुकीनंतर अधिक जागा मिळाल्यास भाजपने मुख्यमंत्रीपदावर दावा केल्यास जेडीयू नैतिकतेच्या कारणावरून जनतेकडे जाऊ शकते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times