हाथरसः उत्तर प्रदेशातील हाथरसमधील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे. १९ वर्षीय पीडित तरुणी या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या सतत संपर्कात होती. सप्टेंबरमध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणी याच गावचा संदीप सिंह हा मुख्य आरोपी आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबाचा आणि मुख्य आरोपीचे फोन कॉल्स तपासले आहे. यात पीडित तरुणी मुख्य आरोपींशी सतत फोनवरून संपर्कात होती, असं युपी पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आलं आहे.

आरोपी संदीपला पीडितेच्या भावाच्या नावावर एका नंबरवरुन सतत फोन कॉल येत असल्याचं तपासात समोर आलं आहे. पीडितेच्या भावाच्या मोबाइल क्रमांकावरून आणि संदीपच्या मोबाइल क्रमांकावर १३ ऑक्टोबर २०१९ पासून बोलणं सुरू झालं. बहुतेक कॉल चांदपा भागात असलेल्या सेल टॉवर्सवरून केले गेले होते. हे गाव पीडितेच्या बुलगढीपासून केवळ २ किमी अंतरावर आहे.

पीडित आणि मुख्य आरोपीत १०४ वेळा कॉल

दोन्ही फोन नंबरदरम्यान ६२ कॉल आउटगोइंग आणि ४२ इनकमिंग कॉल कॉलसह एकूण १०४ कॉल होते. कॉल रेकॉर्डवरून पीडित आणि मुख्य आरोपी सतत संपर्कात असल्याचं दिसून आलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

हाथरसची घटना १४ सप्टेंबरला घडली. यावेळी पीडित तरुणी शेतात काम करत होती. यावेळी तिला आरोपीने खेचून जवळच्या शेतात आणले आणि तिला मारहाण केली. तिच्यावर सामूहिक बलात्कार केला गेला आणि तिचा गळा दाबल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. यामुळे गळ्याचं हाड आणि पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाल्याने अलिगढच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर तिला दिल्लीतील रूग्णालयात पाठवण्यात आलं. तिथे तिचा २९ सप्टेंबरला मृत्यू झाला.

पीडितेच्या मृत्युवरून सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. युपी पोलिसांनी पीडित तरुणीच्या पार्थिवावर रातोरात अंत्यसंस्कार केले. यामुळे हे प्रकरण आणखी चिघळलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here