केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या ३१ जानेवारी रोजी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर करतील. त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. १ फेब्रुवारी हा पहिला शनिवार असल्याने बँकांसाठी तो कामकाजाचा दिवस आहे. मात्र बजेटच्या दिवशी कर्मचारी संघटनांच्या संपामुळं बँकिंग सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. इंडियन बँक असोसिएशनसोबत वेतन करार आणि इतर मागण्यांसंदर्भात चर्चा फिस्कटल्याने युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने दोन दिवसीय संपाची हाक दिली आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नेतृत्व करणाऱ्या नऊ संघटनांचे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन नेतृत्व करते. बँक कर्मचारी संघटनांची १२.२५ टक्के वेतनवाढीची मागणी इंडियन बँक असोसिएशनने फेटाळून लावली. त्याशिवाय विशेष भत्ते आणि पाच दिवसांचा कायम स्वरूपी आठवडा या मागण्यादेखील अमान्य करण्यात आल्या. परिणामी बँक कर्मचारी संघटनांनी ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण आणि एकत्रीकरणाला बँकिंग कमर्चाऱ्यांचा विरोध आहे. सरकाराने मागण्यांची दखल घेतली नाही तर मार्चमध्ये आणखी तीन दिवस संपाचा इशारा बँक कर्मचारी संघटनांनी दिला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times