म. टा. प्रतिनिधी, पुणेः करोनाच्या पार्श्वभूमीवर , यांना परवानगी देण्यात आली असली तरी या ठिकाणी नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांकडून बुधवारपासून (दि. ६) तपासणी मोहीम सुरू केली जाणार आहे. या ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित हॉटेलचालकांना ५० हजार रुपये दंड; तसेच तीनवेळा दंड झाल्यास परवाना रद्दची कारवाई होणार आहे.

हॉटेल सुरू करण्यात आले असताना सुरक्षित वावर आणि सुरक्षिततेबाबत हॉटेलचालकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी होत आहे की नाही, याची भरारी पथकांकडून तपासणी करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

राव म्हणाले, ‘हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारची पाहणी करण्यासाठी भरारी पथके नेमण्याचा निर्णय कोअर कमिटीमध्ये घेण्यात आला आहे. या पथकांमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार असोशिएशनचे प्रतिनिधी, महापालिका, राज्य उत्पादन शुल्क, पोलिस आणि महसूल विभागाचे अधिकारी यांचा समावेश असणार आहे. या पथकांकडून हॉटेलमध्ये जाऊन पाहणी करण्यात येणार आहे. पाहणीत नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित हॉटेलचालकांना ५० हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. तीनवेळा नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित हॉटेलचालकाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे’

‘गणेशोत्सवापूर्वी करोनाबाधित रुग्णांची संख्या ही कमी होती. गणेशोत्सवानंतर सुमारे १८ ते २२ दिवस करोनाबाधित रुग्ण हे वाढल्याचे निदर्शनास आले होते. ही परिस्थिती पुन्हा येऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. हॉटेलचालकांना त्रास देण्याचा हेतू नाही. त्यामुळे या पथकांमध्ये हॉटेल असोशिएशन, रेस्टॉरंट असोशिएशन आणि बार असोशिएशनचे प्रतिनिधी असणार आहेत. बुधवारपासून या पथकांकडून कार्यवाही सुरू केली जाणार आहे’असे राव यांनी स्पष्ट केले.

‘नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे असल्याने हॉटेलचालकांनी नियमांचे पालन केले पाहिजे. मात्र, नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास महाराष्ट्र दारुबंदी कायदा, महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियमन आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई होणार आहे’ असे राव यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करणे सक्तीचे

‘हॉटेलमधील प्रत्येक कर्मचाऱ्याची करोनाबाबतची चाचणी करून घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच हॉटेलमध्ये सॅनिटाझरचा वापर करणे, सुरक्षित वावर राखणे, हवा खेळती राहील, अशी व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत’अशी माहिती राव यांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here