न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर आज रियाच्या अर्जावर सुनावणी झाली. हमीदारांची त्वरित व्यवस्था होऊ शकणार नसल्याने सध्या रोखीच्या जामिनावर सुटका होण्याची मुभा द्यावी, अशी विनंती रियाचे वकील अॅड. सतीश मानेशिंदे यांनी केली. त्याप्रमाणे न्यायमूर्तींनी तशी मुभा देऊन एक लाख रुपयांच्या रोख जामिनावर जामीन मंजूर केला.
एनसीबीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी या आदेशाविरोधात अपिल करता यावे यासाठी एक आठवड्याची स्थगिती देण्याची विनंती केली. मात्र, रियाला जामीन मंजूर करताना आधीच अनेक कठोर अटी लावलेल्या आहेत त्यामुळे विनंती मान्य करणार नाही, असे स्पष्ट करून एनसीबीची विनंती न्यायमूर्तींनी फेटाळली. रियाने जवळच्या पोलिस ठाण्यात सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या कालावधीत नियमितपणे दहा दिवस हजेरी लावावी, असे आदेशही न्यायालयानं दिले.
दीपेश सावंत याची ५० हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली. पासपोर्ट असेल तर तो पोलिसांत जमा करावा आणि तपास अधिकाऱ्यांसमोर प्रत्येक सोमवारी हजेरी लावावी. साक्षीपुराव्यांशी छेडछाड करू नये, साक्षीदारांवर दबाव आणू नये, असे न्यायमूर्तींनी यावेळी स्पष्ट केले. आरोपी अब्देल बसित परिहार आणि रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांचे अर्ज कोर्टाने फेटाळून लावले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times