मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यापासून एकनाथ खडसे पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारी नाकारल्यावर व नंतरही त्यांच्या अन्य पक्षातील प्रवेशाबाबत चर्चा सुरू होत्या. अलीकडेच राष्ट्रवादीतही खडसेंचे स्वागत करू, अशी भूमिका नेत्यांनी घेतली. त्यामुळे खडसेंविषयी खूप चर्चा सुरू आहेत. पक्षाकडून अन्यायकारक वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेतृत्वावर टीका करत आहेत. त्यांनी अलीकडे आपल्याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक त्रास दिल्याचा आरोप करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आता खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू आहे.
वाचा:
गेल्या पंधरवड्यात मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी खडसेंना प्रवेश देण्याबाबत आपल्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांसोबत चाचपणी देखील केली होती. त्यात स्थानिक नेत्यांनी संमिश्र मते मांडत खडसेंबाबत पक्षाला फायदाच होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर राष्ट्रवादीत खडसेंच्या प्रवेशाबाबत अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. एकनाथ खडसे हे मुंबईत असून ते शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या वृत्ताचा खुद्द खडसे व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्ट इन्कार केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times