सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी जोरात पाठपुरावा सुरू आहे. यासाठी मराठा समाजाचे नेते विविध ठिकाणी बैठका घेत आहेत. दरम्यान, शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांनी तीन ऑक्टोबरला पुणे येथे बैठक घेतली होती. या बैठकीला ही उदयनराजे भोसले व त्यांचे बंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निमंत्रण असूनही त्यांनी या बैठकीकडे जाणे टाळले होते.
नवी मुंबई येथील माथाडी भवनात आयोजित नरेंद्र पाटील यांच्या मराठा समाजाच्या व्यापक बैठकीसाठी खासदार उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती हे दोघेही एकत्रित उपस्थित राहणार असल्याची माहिती होती. परंतु आज उदयनराजे भोसले यांनी या बैठकीकडे पाठ फिरविली आहे. या बैठकीसाठी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनाही आमंत्रण होते मात्र, तेही उपस्थित न राहिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.
उदयनराजे भोसले नाशिक येथे नातेवाईकांना भेटायला गेले असून तेथून परतल्यावर ते मराठा आरक्षणाबाबतची मोठी घोषणा करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. ते नाशिकला खासगी कामासाठी गेले असून तिथून परत आल्यावर सातारा येथे मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठकीत मोठी घोषणा करणार असून सातारा येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ही बैठक होणार असल्याची माहिती असून त्याची तारीख, वेळ उदयनराजे जाहीर करणार आहेत असे सांगण्यात येत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times