उद्धव गोडसे, सांगली: गेल्या महिन्यात सांगली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. हजारो एकरांवरील फळबागा, सोयाबीन, भुईमूग, भाजीपाला पाण्याखाली गेला. हाताशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा होती. मात्र, कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणात केवळ २४२ हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे, तर २५ लाख २२ हजार रुपयांच्या नुकसानीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कृषी विभागाचा अहवाल शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी यावर अक्षेप घेतला आहे. सांगली जिल्ह्यात यंदा अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. विशेषतः दुष्काळी भागात पावसाने थैमान घातले. आटपाडी तालुक्यात दरवर्षी सरासरी साडेतीनशे मिलिमीटर पावसाची नोंद होते. यंदा मात्र साडेसातशे मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला. जत, खानापूर-विटा, कवठेमहांकाळ, वाळवा या तालुक्यांमध्येही पावसाचे प्रमाण जास्त होते. सततचा पाऊस आणि ढगाळ हवामानाचा विपरीत परिणाम पिकांवर झाला.

सप्टेंबर महिन्यात पीक काढणीच्या तोंडावर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतात पाणी साचल्यामुळे सोयाबीन, भुईमूग यासह कडधान्याची पिके खराब झाली. डाळिंब, पपई या फळबागांचे नुकसान झाले. एक हंगाम हातातून गेल्याने नुकसान भरपाईपोटी मदत मिळण्याची अपेक्षा असताना कृषी विभागाने जखमेवर मीठ चोळल्याची भावना शेतकऱ्यांची आहे.

सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर कृषी विभागाने पिकांची पाहणी केली. सरकारी नियमानुसार ३३ टक्यां स पेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांच्या नोंदी करण्यात आल्या. तसेच पूरबाधित क्षेत्रातील पिकांची पाहणी केली. पाहणीनुसार मिरज, वाळवा, विटा-खानापूर आणि आटपाडी तालुक्यांतील ९७५ शेतकऱ्यांचे २४२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांचे २५ लाख २२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कृषी अधिकाऱ्यांनी हा अहवाल नुकताच कृषी विभागाला पाठवला. शेतकऱ्यांनी या अहवालावर जोरदार आक्षेप घेतला आहे. पूर्ण पीक वाया गेले तरी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना नुकसान कसे दिसले नाही? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. शेतकरी संघटनांनीही कृषी विभागाच्या सर्वेक्षणाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबत जिल्हा कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांच्याशी संपर्क साधला असता, नियमानुसार प्रत्यक्ष शेतात जाऊन सर्वेक्षण केल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांशी संपर्क साधून पंचनामे करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

९० हजार शेतकऱ्यांचा विमा

जिल्ह्यातील ९० हजार शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरवला आहे. हंगाम संपल्यानंतर विमा कंपन्या सरासरी उत्पन्न आणि नुकसानीचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देतात. गेल्यावर्षी बहुतांश विमा कंपन्यांनी खासगी कंपन्यांच्या पर्जन्यमान नोंदीचा हवाला देत नुकसान भरपाई नाकारली होती. यंदा विमा कंपन्यांनी कृषी विभागाच्या अहवालाचा आधार घेतल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे कठीण होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

तालुकानिहाय बाधित क्षेत्र
तालुका शेतकरी बाधित क्षेत्र
वाळवा ६४८ १०९ हेक्टर
आटपाडी २६४ १०३ हेक्टर
मिरज ६१ २८ हेक्टर
विटा २ २ हेक्टर

अतिवृष्टीने बाधित क्षेत्र – २४२ हेक्टर
एकूण शेतकरी – ९७५
अंदाजे नुकसान – २५ लाख २२ हजार रुपये

आस्मानी संकटानंतर सुलतानी संकटाचा सामना करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. चुकीच्या पद्धतीने केलेल्या सर्वेक्षणातून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेऊन पुन्हा सर्व्हे करावा.
– सोमनाथ देशमुख – शेतकरी, आटपाडी

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here