पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेथॉडिस्ट चर्चजवळ मॉर्निंग वॉक करीत असतांना मंगळवारी पहाटे सुमारे साडेसहाच्या सुमारास सोनाली अडागळे या महिलेला रस्त्याच्या कडेला सुमारे दोन महिन्यांचे बाळ आढळून आले. पुरुष जातीचे हे बाळ असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने बालकाचे सोशल मीडियाद्वारे पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सामाजिक कार्यकर्ते निलेश दास यांनी सोशल मीडियावर माहिती घेण्याचा प्रयत्न करीत असतांना एका व्हॉट्सअॅपवर या बालकाचा फोटो ठेवून ‘मिस यू’ असे लिहले होते. दास यांनी या व्यक्तीशी संपर्क साधला असता, हा माझ्या बहिणीचा मुलगा असून त्याचे दोन दिवसांपूर्वी निधन झाल्याचे सांगितल्यावर धक्का बसला. दास यांनी त्या व्यक्तीला हे बाळ जिवंत असून त्याला ससूनमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले. मामाने ससून रुग्णालयात जाऊन बघितले असता बाळ जिवंत असल्याने ते हैराण झाले. मामाने बळाच्या आईवडिलांचा पत्ता दिल्याने दास यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी बाळाच्या पालकांना पोलिस स्टेशनमध्ये आणले. पालकांनी सुरुवातीला बाळा बाबत नकार दिला, मात्र मामा यांनी हा मुलगा बहिणीचा असल्याचे सांगितले.
शिशूचे वडील अभियंता असून ते एका खाजगी कंपनीमध्ये काम करतात. पोलिसांनी बाळाच्या पालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पालकांनी कशामुळे हे बाळ टाकून दिले याचा पोलिस तपास करत आहेत. याबाबत पोलिस उपनिरीक्षक वैशाली सुळ अधिक तपास करीत आहेत.
बाळाच्या पालकामध्ये वादविवाद असून त्यांचे नेहमी भांडण होत होते. बाळाच्या वडीलांचा त्याच्या पत्नीवर संशय होता. त्यामुळे तो बाळ त्याचे नसल्याचा संशय घेत होता.त्यातून त्यांच्यात भांडण होत असल्याने ते वेगळे राहत होते, मात्र काही दिवसानंतर त्यांच्यात समेट घडून आले. माझ्यासोबत राहायचे असल्यास मुलाचा त्याग करावा लागेल असे सांगितल्यावर दोघांनी मिळून त्या शिशूला चर्चच्या जवळ सोडून दिले होते.
– राजेंद्र सहाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times