ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेच्यावतीने नाताळापर्यंत देशभरात पाच ठिकाणी लस दिली जाणार आहे. दररोज किमान दहा हजार नागरिकांना लस देण्यात येणार आहे. लशीकरण मोहिमेत आरोग्य सेवेचे हजारो कर्मचारी सहभागी होणार आहेत. ब्रिटनमधील ‘द सन’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, करोनाची बाधा होण्याचा धोका असलेल्या नागरिकांना सर्वप्रथम लस दिली जाणार आहे. करोनाची लस देण्यासाठई लीड्स, हल आणि लंडनमध्ये केंद्र बनवण्यात येणार आहे. या केंद्रावर प्रशिक्षणार्थी परिचारिका आणि पॅरामेडिक्स असणार आहेत. त्याशिवाय मोबाइल युनिटही तयार करण्यात येणार आहेत. यामुळे गरजू लोकांना आणि केअर होम्समध्ये लस देता येणार आहे.
वाचा:
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लस चाचणीचे परिणाम एका महिन्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लशीकरण मोहिमेची तयारी सुरू करण्यात आली आहे. नाताळापूर्वी मोठ्या प्रमाणावर लशीकरण मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. करोना प्रतिबंध लस केंद्रावर ब्रिटीश सैन्यालादेखील तैनात करण्यात येणार आहे.
वाचा:
ब्रिटनमध्ये सध्या ऑक्सफर्ड विद्यापीठाची लस आघाडीवर आहे. या लशीची चाचणी एप्रिल महिन्यापासूनच सुरू आहे. आतापर्यंत लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लशीला लवकरच मंजुरी मिळणार असल्याची दाट शक्यता आहे.
ब्रिटन सरकारने लशीला मंजुरी मिळण्याआधीच १० कोटी लस डोसची मागणी नोंदवली आहे. ऑक्सफर्डच्या लशीचे दोन डोस घ्यावे लागणार आहेत. यामुळे ब्रिटन सरकारसमोर समस्या निर्माण झाली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसह आरोग्य सेवेशी निगडीत असलेल्या डॉक्टरांची मदत लशीकरण मोहिमेसाठी घेण्याचा प्रस्ताव आहे.
वाचा:
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने लशीबाबत मोठी माहिती दिली आहे. करोनाला प्रतिबंध करणारी एक आश्वासक लस या वर्षाखेर येण्याची दाट शक्यता असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रियस यांनी सांगितले. लस उपलब्ध झाल्यानंतर त्याच्या समान वितरणासाठी सर्व जागतिक नेत्यांनी एकजूट आणि प्रतिबद्धता दाखवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times