एजाज लकडावाला सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून आज चौकशीदरम्यान त्याने दाऊद टोळीबाबत महत्त्वाचा तपशील पोलिसांना सांगितला. लकडावालाच्या दाव्यानुसार कराचीत दाऊदची दोन घरे आहेत. कराचीतील डीफेन्स हाउसिंग भागात त्यातील एक घर आहे तर दुसरे घर क्लिफ्टन भागात आहे. या दोन्ही घरांचे संपूर्ण पत्तेही लकडावालाने दिले आहेत.
लकडावालाने सांगितलेले दाऊदच्या घरांचे पत्ते असे…
१. ६ ए, खायबान तंजीम, फेज- ५, डीफेन्स हाउसिंग एरिया, कराची.
२. डी- १३, ब्लॉक- ४, क्लिफ्टन, कराची.
तपास अधिकाऱ्याच्या हवाल्याने आयएएनएस या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने दाऊदला विदेशात जाण्यासाठी बनावट पासपोर्ट मिळवून देण्यात मदत केल्याचा गौप्यस्फोटही लकडावालाने केला आहे. दाऊदसह त्याचा भाऊ अनीस इब्राहिम आणि दाऊदचा राइट हँड छोटा शकीलकडेही बनावट पासपोर्ट आहे आणि आयएसआयच्या मदतीने त्यांनी हे पासपोर्ट मिळवलेत, अशी माहिती लकडावालाने चौकशीदरम्यान पोलिसांना दिली.
दाऊदच नाही तर अनीस आणि छोटा शकीललाही आयएसआयने आश्रय दिला आहे, असे सांगताना दाऊद इब्राहिम सध्या कराचीतच वास्तव्याला असण्याची शक्यता जास्त आहे, असेही लकडावाला पोलीस तपासात म्हणाला, असे संबंधित तपास अधिकाऱ्याने पुढे नमूद केले. लकडावालाची चौकशी यापुढेही सुरूच राहणार असून त्याच्याकडून डी गँगची खडान् खडा माहिती मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न राहणार आहे.
दाऊदचा नेपाळमध्ये अड्डा
दाऊदने नेपाळची राजधानी काठमांडूत मोठा अड्डा बनवला आहे. तेथून गुन्हेगारी कारवायांचे नियंत्रण केले जाते. भारत-नेपाळ सीमेवरून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा भारतात पाठवण्यात येतात. यात काठमांडूतील पाकिस्तानी दूतावासाचे काही अधिकारी दाऊद टोळीला मदत करतात, असा गौप्यस्फोटही लकडावालाने तपासादरम्यान केला.
अशा ठोकल्या लकडावालाला बेड्या
लकडावालाची मुलगी सानिया हिला मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने ३० डिसेंबर रोजी बनावट पासपोर्टप्रकरणी अटक केली होती. ती मुंबईहून नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात होती. सानियाच्या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून एजाजला ८ जानेवारी रोजी पाटण्यात बेड्या ठोकल्या. एजाजची २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली असून सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे.
२००३ मध्ये झाला होता हल्ला
दाऊदचा जवळचा सहकारी छोटा शकीलनं २००३मध्ये बँकॉकमध्ये लकडावाला यांच्यावर हल्ला केला होता. तो जखमीही झाला होता. या हल्ल्यातून तो बचावला होता. त्यानंतर तो नेपाळमध्ये राहत होता. तेथून तो पाटण्यात येत असे. मुंबईतील अनेक खंडणी प्रकरणांत त्याचं नाव समोर आलं होतं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times