पासवान हे व्यापक जनाधार असलेले बिहार राज्यातील लोकप्रिय नेते होते. केंद्रातील अनेक सरकारांमध्ये त्यांनी मंत्री म्हणून कार्य करताना विविध खाती समर्थपणे सांभाळली. पासवान यांचा आणि माझा घनिष्ट परिचय होता. त्यांच्या निधनामुळे देशाने एक उत्तम संसदपटू आणि लोकप्रिय नेता गमावला आहे. पासवान यांच्या आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना करतो तसेच त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक संवेदना व्यक्त करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी रामविलास पासवान यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. राजकारणात प्रदीर्घ अनुभव असलेल्या पासवान यांची सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेली होती, त्यांच्या निधनाने शोषित, दुर्बल घटकांसाठी लढणारा नेता हरपला आहे, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.
लोकप्रिय दलित नेता हरपला: आठवले
रामविलास पासवान यांच्या निधनाने देशभरात लोकप्रिय असलेला दलितांचा द्रष्टा नेता आणि संसदीय राजकारणातील दलितांचा लोकप्रिय चेहरा हरपला आहे. त्यांच्या निधनाने भारतीय राजकीय सामाजिक क्षेत्राचे कधीही भरून येणार नाही असे नुकसान झाले आहे, अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पासवान यांना श्रद्धांजली अर्पण केली.
एक मानवतावादी नेता गमावला: फडणवीस
रामविलास पासवान यांच्या आकस्मिक निधनाने एक मानवतावादी नेता आपण गमावला आहे. गरिब आणि वंचितांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेला संघर्ष कायम स्मरणात राहील, अशी शोकसंवेदना विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि बिहारचे भाजपा निवडणूक प्रभारी यांनी व्यक्त केली आहे. आपल्या शोकसंवेदनेत देवेंद्र फडणवीस म्हणतात की, रामविलास पासवान यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. अनेक दशके त्यांनी जनतेच्या मनावर अधिराज्य केले. बिहारच्या विकासाला आणि राजकारणाला एक नवीन उंची त्यांनी प्रदान केली. सुमारे ९ वेळा त्यांनी संसदेत प्रतिनिधीत्त्व केले. अतिशय विनम्र आणि लोकांच्या मदतीसाठी कायम धावून जाणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. महाराष्ट्रातील अनेक प्रश्न घेऊन त्यांच्याशी सातत्याने संवाद होत असे आणि प्रत्येकवेळी त्यांचा प्रतिसाद सकारात्मक असायचा. गरिब आणि वंचितांसाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. या महान नेत्याला माझी विनम्र श्रद्धांजली. त्यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांच्या दु:खात आपण सहभागी आहोत.
प्रदीर्घकाळ सहकारी: पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांनीही पासवान यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला. लोक जनशक्ती पक्षाची स्थापना करणारे रामविलास पासवान हे लोकप्रिय नेते होते. संसदेत ते माझे प्रदीर्घकाळ सहकारी राहिले, अशा शब्दांत पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times