गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत. महाराष्ट्र सरकारलाही या प्रकरणी लक्ष्य करण्यात आलं होतं. तर, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं. मात्र, एम्सनं दिलेल्या अहवालानुसार सुशांतनं आत्महत्याचं केल्याचं स्पष्ट होतं आहे. यावरूनच पुन्हा एकदा आक्रमक झाली असून सुशांतसिंह प्रकरणाप्रमाणेच सीबीआयचे माजी संचालक अश्विनीकुमार यांच्याही मृत्यूचे रहस्य सीबीआयनं शोधावं, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून यावरून प्रश्नचिन्हही उपस्थित केले आहेत.
‘सीबीआयच्या प्रमुख संचालकपदी काम केलेली व्यक्ती नैराश्यानं ग्रासते, जगण्यासारखं काही उरलं नाही, आयुष्याचाच कंटाळा आलाय म्हणून आत्महत्या करते यावर आपण सगळे डोळे मिटून विश्वास ठेवतो, हे काही पटत नाही,’ अशी शंका शिवसेनेनं उपस्थित केली आहे.
‘ अश्विनीकुमार यांना खरेच आयुष्याचा कंटाळा आला की त्यांच्यावर कुणाचा दबाव होता, यावर सध्या हिमाचल मध्ये वास्तव्यास असलेल्या नटीनं भाष्य केलं पाहिजे. अश्विनीकुमारांना कोणत्या परिस्थितीत आत्महत्या करावी लागली, हा प्रश्न कर्कश भुंकणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी विचारायला हवा. सुशांत प्रकरणात आत्महत्या नसून हत्याच आहे, हे सिद्ध करण्यासाठी ज्यांनी जिवाचा अटापिटा केला त्यांना सीबीआयचे माजी संचालक अश्विनीकुमार यांच्या आत्महत्येमागे काहीतरी रहस्य आहे, कारस्थान आहे असं वाटू नये, हे गौडबंगाल आहे,’ असं म्हणत शिवसेनेनं अप्रत्यक्षरित्या कंगनावर निशाणा साधला आहे.
सामनाच्या अग्रलेखातील काही महत्त्वाचे मुद्दे
>> सुशांतसिंह रातपूतनं आत्महत्या केली असं वैद्यकीय पुरावे येऊनही ते मानायला लोक तयार नाहीत. हाथरसची तरूणी मरणाच्या दारातून सांगतेय, माझ्यावर बलात्कार झाला. त्यावर सरकार विश्वास ठेवायला तयार नाही. आपल्या देशात काय चालले आहे तेच कळायला मार्ग नाही.
>> सीबीआयचे माजी संचालक अश्विनीकुमार यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाला, ते का मेले, हे रहस्य शोधण्यात कोणालाच रस नाही. काळ मोठा कठिण आला आहे.
>> मुंबईत सुशांतने आत्महत्या केली. त्याआधी काही दिवसांपासून तो निराश होता. अमली पदार्थांच्या आहारी गेला होता. वृत्तवाहिन्या, भाजपा आय.टी. सेल, त्यांचे पुढारी यांनी सुशांत प्रकरणातील अनेक रहस्ये शोधून धोबीघाटावर आणली. तो रहस्यपट पाहून आफ्रेड हिचकॉक, शेरलॉक होम्स, जेम्स बॉण्डसारखे ‘नायक’ही अचंबित झाले असतील. या सर्व हिचकॉक, शेरलॉक होम्सच्या अवलादींना अश्विनीकुमारांच्या लटकलेल्या देहामागे एखादे रहस्य दडलेले आहे याचा सुगावा लागू नये?
>> सुशांतच्या आत्महत्येनंतर जे अनेक प्रश्न व शंका निर्माण केल्या गेल्या त्या अश्विनीकुमार यांच्याबाबतीतही निर्माण होऊ शकतात. सुशांत पडद्यावरचा हीरो होता. अश्विनीकुमार हे पोलीस प्रशासनाचे ‘नायक’ होते. हिमाचलच्या एका नटीने सुशांत आत्महत्या प्रकरण लावून धरले. पण त्याच नटीच्या हिमाचलमध्ये सी.बी.आय.च्या माजी संचालकांनी आत्महत्या केली यावर कुणी उसासाही सोडू नये? अश्विनीकुमार का मरण पावले, हे रहस्य राहू नये.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times