सांगलीः जिल्हाधिकारी कार्यालय आणि शुश्रुषा सल्ला मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्थेने लॉकडाउनमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून लोकांचे मानसिक स्वास्थ्य ढासळल्याची माहिती समोर आली आहे. कौटुंबिक, आर्थिक आणि व्यावसायिक अडचणींमुळे ८५ टक्के लोकांमध्ये आक्रमकता, चिडचिडेपणा वाढला आहे. यातून वेळीच बाहेर पडण्याचा मार्ग न सापडल्यास येणाऱ्या काळात आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याचा धोका मानसोपचार तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. सांगली जिल्हा प्रशासन आणि शुश्रुषा संस्थेने सुरू केलेल्या हेल्पलाइनवर रोज शंभराहून अधिक व्यक्ती तणावमुक्तीसाठी मदत मागत आहेत. यावरून मानसिक आजारांचा धोका स्पष्ट दिसत आहे.

लॉकडाउन काळात केलेल्या सर्वेक्षणाबाबत माहिती देताना सुश्रुषा संस्थेचे प्रमुख मानससोपचार तज्ज्ञ कालिदास पाटील म्हणाले, ‘करोनाच्या संकटामुळे समाजात कौटुंबिक, आर्थिक, व्यावसायिक प्रश्न निर्माण झाले आहेत. यातून निर्माण झालेल्या ताण-तणावांना सामोरे जाता येत नसल्याने सर्वच घटकांचे मानसिक स्वास्थ्य हरवत आहे. शुश्रुषा सल्ला मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्थेने लॉकडाउन काळात सांगली जिल्ह्यातील ९०८५ कुटुंबांचा अभ्यास केला. सर्वेक्षणात भीती, काळजी ५५ टक्के, चिंता व ताणतणाव ४१ टक्के, अस्वस्थता, उदासिनता ६२ टक्के, चिडचिडेपणा, राग व आक्रमकता ८५ टक्के, तर एकाकीपणा, सहनशीलतेचा अभाव अशा तक्रारी ४६ टक्के व्यक्तींमध्ये दिसून आल्या आहेत. याशिवाय झोप, भुकेच्या तक्रारी, नकारात्मक विचार, मानसिक थकवा, मनोकायिक त्रास वाढले असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांच्या निदर्शनास आले आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने आपत्ती व्यवस्थापनाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून ‘जागर जाणिवांचा, उमेद नव्या आयुष्याची’ या प्रकल्पांतर्गत केलेल्या या विशेष मानसशास्त्रीय सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच शुश्रुषा संस्थेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला.

‘शुश्रुषा संस्थेने सादर केलेल्या अहवालाची जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन लोकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी विशेष अभियान सुरू केले आहे. मानसिक आजारांचा सामना करणाऱ्या लोकांना वेळीच सल्ला व मार्गदर्शन मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाने मोफत हेल्पलाइन सुरू केली आहे. या हेल्पलाइनवर पहिल्याच आठवड्यात तीनशेहून अधिक लोकांनी मानसिक आधाराची व मदतीची मागणी केली. यामध्ये वृद्ध व्यक्तींचा सर्वाधिक समावेश आहे. आजार व मृत्यूची भीती, झोपेच्या तक्रारी, कुटुंबीयांच्या भविष्याची काळजी, आर्थिक समस्यांवर रोज शंभराहून जास्त लोकांना मानस तज्ज्ञ समुपदेशन करीत आहेत. याशिवाय संस्थेने सोशल मीडियाद्वारे १५ हजारांहून अधिक लोकांशी संवाद साधत त्यांना आधार देण्याचे काम केले.

सांगली जिल्हा प्रशासन व शुश्रुषा संस्थेने सुरू केलेल्या उपक्रमाची राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये गरज असल्याचे मत मानस तज्ज्ञ कालिदास पाटील यांनी व्यक्त केले. करोनामुळे नागरिक हतबल झाले आहेत. बेरोजगारी, भविष्याची काळजी, व्यवसायाचे नुकसान यामुळे लोकांमध्ये नैराश्य, ताण तणाव वाढले आहे. गृहिणींच्या मानसिकतेवरही याचा गंभीर परिणाम जाणवत आहे. यावर वेळीच उपाययोजना न केल्यास येणाऱ्या काळात आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याचा धोका आहे. गेल्या दीड-दोन महिन्यात झालेल्या आत्महत्यांची संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने लोकांचे मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे पाटील यांनी सांगितले.

कौटुंबिक कलह वाढले
दीर्घकाळ एकत्र राहिल्याने अनेक कुटुंबांमधील व्यक्तींच्या खासगी आयुष्यावर मर्यादा आल्या आहेत. नोकरी जाणे, उत्पन्नात घट, आर्थिक असुरक्षिततेमुळे अस्वस्थता वाढली आहे. सण, समारंभ, बाहेर फिरणे, यात्रा, जत्रांमधील आनंद थांबल्याने लोकांचा भावनिक कोंडमारा होत आहे. यातून कुटुंबांमध्ये कलहांचे प्रमाण वाढत आहे, असे मानस तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

मानसिक आजारांचे प्रमाण

आक्रमकता, चिडचिडेपणा ८५ टक्के

भीती, काळजी ५५ टक्के

चिंता, तणाव ४१ टक्के

अस्वस्थता ६२ टक्के

सहनशीलतेचा अभाव ४६
टक्के

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here