मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा भव्यदिव्य शपथविधी सोहळा दादर येथील शिवतीर्थावर पार पडला होता. या सोहळ्यावर २.७९ कोटी रुपये इतका खर्च झाल्याची माहिती आता आरटीआय अंतर्गत करण्यात आलेल्या अर्जावरील उत्तरातून पुढे आली आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी शिवतीर्थावर या आघाडीच्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आघाडीतील तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन अशा सहा कॅबिनेट मंत्र्यांना यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली होती. या शपथविधी सोहळ्याचा भव्य सेट कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी उभारला होता. या दिमाखदार अशा सोहळ्यावर २.७९ कोटी इतका खर्च करण्यात आल्याची माहिती आता पुढे आली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते निखिल चनभट्टी यांनी याबाबत माहिती मागितली होती. चनभट्टी यांच्या अर्जावरील उत्तरात शपथविधी सोहळ्यावरील खर्चाचा तपशील देण्यात आला आहे. विशेष म्हणजे व्यासपीठावर करण्यात आलेल्या फुलांच्या सजावटीसाठी ३ लाख रुपये इतका खर्च करण्यात आला होता, असेही या माहितीत स्पष्ट झाले आहे. पाच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी सोहळा वानखेडे स्टेडियमवर झाला होता. त्या सोहळ्यावर ९८.३७ लाख रुपये इतका खर्च झाला होता, अशी माहितीही यानिमित्ताने पुढे आली आहे. चनभट्टी यांनी गेल्या १० वर्षांत सरकारचा शपथविधी व अन्य शासकीय कार्यक्रमांवर किती खर्च झाला, याबाबतचा तपशील आपल्या अर्जात मागितला होता.

दिग्गजांनी लावली होती हजेरी

शिवतीर्थावरील शपथविधी सोहळ्याला अनेक दिग्गजांची हजेरी होती. महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार, माजी मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस, रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी, मनसे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, डीएमके प्रमुख एमके स्टॅलिन हे नेते सोहळ्याला उपस्थित होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here