लंडन : इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर परतला आहे. राजस्थान रॉयल्स संघातून आता तो आयपीएलमध्ये खेळणार आहे. आजारी असलेल्या वडिलांनीच त्याला पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानाकडे परतण्यासाठी प्रोत्साहन दिले. मैदानात उतरणे हे त्याचे कर्तव्य असल्याचे वडिलांनी त्याला समजावले. स्टोक्सने आपल्या वडिलांची ही आज्ञा शिरोधार्य मानून आयपीएल खेळण्याचा निर्णय घेतला.

मेंदूचा कर्करोग झाल्यामुळे वडिलांची काळजी घेण्यासाठी स्टोक्स ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानविरुद्धची मालिका सोडून न्यूझीलंडला वडिलांकडे रवाना झाला होता. त्यामुळे तो आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता कमी होती. आपले वडील आणि कुटुंबियांसमवेत पाच आठवडे घालवल्यानंतर तो संयुक्त अरब अमिरातीत परतला आहे. राजस्थान रॉयल्स संघातून तो खेळेल.

स्टोक्सने यासंदर्भात लिहिलेल्या स्तंभात म्हटले आहे, ‘ख्राइस्टचर्च येथील माझे वडील, आई आणि माझ्या भावाचा निरोप घेणे खूप अवघड होते. एक कुटुंब म्हणून खूप कठीण प्रसंगातून आम्ही गेलो. मात्र त्या काळातही आम्ही एकमेकांची साथ सोडली नाही. पण माझ्या कुटुंबियांच्या प्रेम आणि आशीर्वाद यामुळे मी पुन्हा खेळाकडे वळलो.’

आपल्या कुटुंबियांशी झालेल्या संवादाबद्दल स्टोक्स लिहितो, ‘माझ्यावर जी जबाबदारी आहे, त्याची वडिलांना पूर्ण जाणीव आहे. ते मला म्हणाले, एक पती आणि वडील म्हणून जशी तुझी जबाबदारी आहे, तसेच तुझे काम करणे हेदेखील तुझे कर्तव्य आहे. आम्ही त्यानंतर बराच काळ चर्चा केली. नंतर मी खेळाकडे लक्ष केंद्रित करावे यावर सगळ्यांचे एकमत झाले.’
२९ वर्षीय स्टोक्स म्हणतो, ‘जेव्हा मी न्यूझीलंडला पोहोचलो तेव्हा पहिल्या आठवड्यात मी माझ्या वडिलांकडे लक्ष देऊ लागलो. त्यावेळी वडिलांना काय वाटते आहे, आईची काय इच्छा आहे, हे कळत नव्हते. त्यांच्याशी संवाद कसा साधावा, हे समजत नव्हते. पण आईने सगळे सोपे केले. आता वडिलांसोबत काही काळ घालवणे हे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, असे तिने समजावले. त्यानंतर आई आपल्या कामासाठी बाहेर गेल्यावर मी वडिलांची काळजी घेऊ लागलो. शेवटी सगळे स्थिरस्थावर झाले. मी वडिलांसोबत बसत असे. टीव्ही पाहात असे मग त्यांना बाहेर फिरण्यासाठी नेत असे. ते थकून गेले की पुन्हा त्यांना घरी आणत असे आणि दुपारी पुन्हा आम्ही उद्यानात जाऊन मोकळ्या हवेचा आनंद घेत असू.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here