मराठा क्रांती मोर्चासह अनेक विद्यार्थी संघटनांनी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी लावून धरली होती. खासदार संभाजी राजे यांनी ही परीक्षा रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राज्य सरकारला दिला होता. एकूण सुमारे २ लाख ६० हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. मराठा आंदोलनकर्त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राज्य सरकारवर ही परीक्षा न घेण्यासाठी दबाव निर्माण झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक पार पडली. त्यात ही परीक्षा तूर्त लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘करोना आणि लॉकडाऊनचं संकट होतं, अजूनही ते दूर झालेलं नाही. करोनाकाळात अभ्यासिका बंद होत्या, अनेक विद्यार्थ्यांचीही मागणी होती की ही परीक्षा पुढे ढकलली जावी, त्यामुळे परीक्षा पुढे ढकलली, ही परीक्षा आता कधी होणार त्याबाबतची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.’
मराठा आरक्षण प्रकरणी वेळ पडल्यास आपण तलवारही उपसू शकतो असा इशारा खासदार संभाजीराजेंनी दिला होता. खासदार उदयनराजे यांनीही आज सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्यात यायला नको अशी भूमिका मांडली होती. लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये मराठा समाजासह अन्य समाजाचेही उमेदवार असतात, असे भुजबळ म्हणाले होते.
यापूर्वी कोविड -१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. ती आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times