‌म. टा. प्रतिनिधी, मुंबई

राज्यात रुग्णांची संख्या कमी होत असून, बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. करोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून, टेलीआयसीयू प्रकल्प त्यासाठी उपयुक्त ठरत आहे. त्याच्या मदतीने करोनामुळे होणारा मृत्युदर एक टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट आहे. टेलीआयसीयूचा राज्यभरात विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकारात्मक असल्याची माहिती आरोग्यमंत्री यांनी शुक्रवारी दिली.

राज्यात भिवंडी, औरंगाबाद, जालना, सोलापूर पाठोपाठ जळगाव आणि अकोला येथील रुग्णालयांमध्ये टेलीआयसीयूचा शुभारंभ आरोग्यमंत्री टोपे यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. खान्देशातील जळगाव आणि विदर्भातील अकोला येथील जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता आदी यावेळी उपस्थित होते.

आरोग्य सुविधेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. राज्यातील करोना रुग्णांचा मृत्युदर ही चिंतेची बाब असून, हा मृत्युदर एक टक्क्यापेक्षाही कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत, असे टोपे म्हणाले. राज्यात विशेषज्ञांची जाणवणारी कमतरता टेलीआयसीयू तंत्रज्ञानामुळे काहीशी भरून निघणार असून, करोनाच्या गंभीर रुग्णांवर विशेषज्ञांच्या मार्गदर्शनातून उपचार झाले तर मृत्युदर कमी होण्यासाठी त्याचा लाभ होईल.

राज्यात करोना रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. या औषधाचा सर्रास वापर न करता डॉक्टरांनी जपून आणि ज्यांना आवश्यकता आहे अशा गंभीर रुग्णांसाठी ते वापरावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले. राज्याचा मृत्युदर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. टेलीआयसीयू सुविधा सध्या सहा जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. राज्यात अन्यत्र देखील सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली असून, ते याबाबत सकारात्मक आहेत. ही सेवा राज्यभर सुरू झाल्यास दुर्गम भागातील रुग्णांना देखील विशेषज्ञांच्या उपचाराचा लाभ मिळू शकेल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. मेडिस्केप इंडिया फाउंडेशनच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (सीएसआर) माध्यमातून ही सुविधा देण्यात येत आहे. यावेळी मेडिस्केप इंडिया फाऊंडेशनच्या डॉ. सुनिता दुबे यांनी या तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here