अहमदनगरः ‘पवार साहेब हे आमचे नेते, मार्गदर्शक आणि सर्वेसर्वा आहेत आणि त्याचा मला अभिमानही आहे. पण मी कोणाच्या खांद्यावर बसतो याकडं लक्ष देण्यापेक्षा आपण कोणत्या कडेवर आहात, असं सडेतोड उत्तर आमदार यांनी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांना दिलं आहे. तसंच, आतातरी आपण आहात त्याच ठिकाणी राहिलात तर आपल्यावरील लोकांचा विश्वास नक्कीच वाढेल,’ असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघातील मिरजगाव येथून जात असताना तेथील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘रोहित पवार रोज हे ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सल्ले देत असतात. त्यांना त्यांची उंची फार वाढल्या सारखी वाटते. पण त्यांना अजून माहिती नाही, शहर पवारांच्या खांद्यावर बसून ते त्यांची उंची मोजतात. अशी जहरी टीका पडळकर यांनी केली होती.’ या टीकेला रोहित पवार यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.

‘माझ्या मतदारसंघातील या एकाच नाही तर बहुतांश रस्त्यांची ही अवस्था होती आणि अजूनही काही रस्त्यांची अशीच दुरवस्था आहे. कारण, या मतदारसंघात गेली पंचवीस वर्षे आपल्याच पक्षाचे आमदार होते. त्यामुळं इथं २५ वर्षांचा बँकलॉग आहे. मला आमदार होऊन अजून एक वर्षही झालं नाही. तरी, मी विकासाचा ही दीर्घ बॅकलॉग भरून काढण्यासाठी काम करतोय आणि करोना नसतो तर तर, मतदारसंघातील बरेचसे प्रश्न आत्तापर्यंत मार्गी लावले असते. पाच वर्ष याच मतदाससंघातील आमदार राज्यात वजनदार खात्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते, तरीही रस्त्यांची ही दुरावस्था आहे, याचा जाब खरंतर तुम्ही त्यांना विचारायला हवा होता,’ असा पलटवार रोहित पवार यांनी केला आहे.

‘कर्जत- जामखेड मतदारसंघाची निवड का केली? असा प्रश्न मला अनेकदा विचारण्यात आला. ते म्हणजे या मतदारसंघाची अशी दुरावस्था असल्यानं इथं काम करण्यासाठी खूप वाव आहे. हे मी आधीच सांगितलंय, त्यामुळं आपण मिरजगावातील खराब रस्ता आज दाखवला, यात काहीच नवीन नाही. या मतदारसंघातील लोकांनी विश्वासाने माझ्यावर जबाबदारी टाकली आहे आणि मी ती पूर्ण करणारच. मी हवेतून पाणी काढणारा किंवा वाघाच्या जबड्यात हात घालणारा नेता नाही तर जमीनीवर उतरुन काम करणारा, लोकांचा विकास करण्याची शपथ घेऊन ती पाळणारा कार्यकर्ता आहे,’ असा टोला रोहित पवारांनी पडळकरांना लगावला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here