वाचा:
दुपारपर्यंत ऊन आणि तीनच्या दरम्यान अचानक सुरु झालेल्या पावसामुळे कामासाठी बाहेर पडलेल्या लोकांची धापवळ झाली. आठवडाभर शहरातील तापमान वाढले असून दिवसरात्र उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना काही वेळासाठी तरी दिलासा मिळाला. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शुक्रवारी दिलेल्या बुलेटिनमध्ये शहरात दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली होती. पाऊस पडण्यापूर्वी काही काळ शहरावर दहा ते तेरा किलोमीटर उंचीचे ढग तयार झाल्याचे चित्र आयएमडीने प्रसिद्ध केलेल्या रडारवरील नकाशातून स्पष्ट झाले.
वाचा:
देशातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू असल्याने आता पावसाळा संपला असाच नागरिकांचा समज झाला आहे. गेल्या आठवडाभर शहरात पाऊस पडला नाही. तापमान वाढल्यामुळे दिवसभर उकाडा आणि उन्हाचे चटकेही बसत आहेत. शनिवारी सकाळी देखील ऊन होते, उकाडा वाढला होता. ऊन्हाची तीव्रताही जास्त होती. पण तीनच्या दरम्यान ढग दाटून आले आणि वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काळोख पसरला आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडला. विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने अनेकांना धडकी भरवली.
वाचा:
सिंहगड रस्ता, सारसबाग, कात्रज, हडपसर, कोंढवा, एरडंवणे, कर्वेनगर, कर्वे रस्ता, डेक्कन परिसरामध्ये पाण्याचे लोंढे वाहत होते. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते. पाण्याचा वेग पाहून लोक गाड्या रस्त्याच्या कडेला लाऊन सुरक्षित जागी उभे राहिले. काही भागात झाडांच्या फांद्याही कोसळल्या, वीजपुरवठाही खंडित झाला. तासभर जोराचा पाऊस झाला. नंतर जोर ओसरला. पुढील दोन दिवस शहरात दुपारनंतर मेघगर्जनेसही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे.
राज्याच्या अनेक भागांत पाऊस
शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाचे थैमान घातले आहे. मेघगर्जनेसह जोरदार पावसाने शेतीच्या कामात अडथळे आणले आहेत. जोरदार पावसामुळे भात, सोयाबीन, भुईमूग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुपारनंतर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि जोरदार वाऱ्यासह तुफान पाऊस पडत आहे. मुंबईतही दुपारपासून वातावरण पूर्णपणे बदलले आहे. ढगांच्या दाटीने दृष्यमानता कमी झाली आहे. ढगांचा गडगडाट सुरू असला तरी पावसाचे प्रमाण मात्र कमी आहे. ठाणे, पनवेल, नव मुंबईतही अशीच स्थिती आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times