वाचा:
काँग्रेसने गेल्या पाच सहा वर्षांत ईव्हीएम, निवडणूक आयोग यांच्यावर आपल्या पराभवाचे खापर फोडले आहे. जनतेने आपल्याला नाकारले हे खुल्या दिलाने मान्य करण्याऐवजी काँग्रेस नेतृत्वाने मतदान यंत्रे, निवडणूक आयोग यांच्यावर दोषारोप केले आहेत. पूर्वी पराभवानंतर मतदान यंत्रे, निवडणूक आयोग वगैरेंवर खापर फोडले जायचे. आता निवडणुकांपूर्वीच निमित्त शोधण्याचा प्रकार चालू आहे. आता काही माध्यमांवर झालेल्या कारवाईच्या निमित्ताने भाजपाला लक्ष्य करण्याचा काँग्रेस नेतृत्वाचा प्रयत्न म्हणजे ‘आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी’ असाच प्रकार आहे. मतदार मोदी सरकार विरुद्धच्या अशा अपप्रचाराला थारा देत नाहीत, हे २०१९ च्या निवडणुकीत सिद्ध झाले आहे. राफेल विमानांच्या खरेदीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चिखलफेक केली होती. मात्र मतदारांनी २०१४ पेक्षाही अधिक जागा भाजपला देऊन काँग्रेसला सणसणीत चपराक लगावली होती, याचा काँग्रेसला विसर पडलेला दिसतो आहे. देशात घडलेल्या कोणत्याही घटनेला भाजपाला जबाबदार धरण्याऐवजी मतदार आपल्याला वारंवार का नाकारतात याचे आत्मपरिक्षण काँग्रेसने करावे, असा खरमरीत सल्ला महाराष्ट्र भाजपने दिला आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला वेगवेगळया आघाड्यांवर आलेले अपयश झाकण्यासाठी या कारवाईचा वापर केला जात असावा, अशी शंका घेण्यास जागा आहे. अन्यथा मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्रकार परिषद घेऊन आपली कार्यक्षमता जगजाहीर करण्यास सांगण्याचे काहीच कारण नव्हते, असेही भाजपने काढलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. एखादी वाहिनी गैरप्रकार करून आपली प्रेक्षकसंख्या फुगवून दाखवत असेल तर त्या वाहिनीवर कारवाई करणे समर्थनीयच आहे. भाजपा अशा गैरप्रकारांना कदापी पाठीशी घालणार नाही. मात्र राजकीय सूडबुद्धीने एखाद्या वाहिनीला लक्ष्य केले जात असेल तर त्याला भाजपा जोरदार विरोध करेल. महाराष्ट्रातील सत्तारूढ पक्षांना अडचणीच्या ठरतील अशा बातम्या प्रसारित केल्या म्हणून दूरचित्रवाणी वाहिन्यांना काही ना काही निमित्ताने कोंडीत पकडले जात असेल तर ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी ठरेल, असेही भाजपच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी हे पत्रक प्रसिद्धीसाठी जारी केले आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times