मुंबईः सुशांतसिंह राजपूत प्रकरण आता एका वेगळ्याच टप्प्यावर येऊन पोहोचले आहे. मुंबई पोलिसांची व महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी ८० हजार फेक अकाउंट सुरू असल्याचा गौप्यस्फोट केला होता. याप्रकरणावरून यांनी केंद्र सरकारला सूचनावजा इशारा दिला आहे. तसंच, मला सुद्धा घाणेरडे संदेश पाठवणारे बहुतेक परदेशातील होते, असा खुलासा केला आहे.

सुशांतसिंह प्रकरण आणि सोशल मीडियावरील फेक अकाउंटबद्दल संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक या सदरात आपली भूमिका मांडली आहे. ‘ट्विटर, व्हॉट्सअॅप आता नवीन विद्यापीठे व लढण्याची रणांगणे झाली आहेत. हाथरस सुशांत प्रकरणात ते स्पष्ट दिसले. कंगना या नटीने मुंबईस पाकिस्तान म्हटलं व त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या तेव्हा माझ्या फोनवर घाणेरडे संदेश पाठवणारे बहुतेक नंबर परदेशातील होते. हे सर्व ठरवून झाले. सुशांत प्रकरणातील ८० हजार फेक अकाउंटपैकी ते नंबर असायला हरकत नाही,’ अशी शंका संजय राऊत यांनी उपस्थित केली आहे.

गृहमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा

‘अमित शहा आज देशाचे गृहमंत्री आहेत. सायबर फौजांचा बेकायदेशीर वापर देशाला, समाजाला घातक ठरू शकतो हे त्यांनी मान्य केले पाहिजे. राजकारणात विरोधकांचे चारित्र्यहनन आणि विरोध करणाऱ्यांना खच्ची करण्यासाठी या फौजांचा वापर उद्या देशावरच उलटू शकतो. यांनीच एका कार्यक्रमात सांगितले होते, ”आम्ही कोणतीही बातमी आमच्या हजारो ‘व्हॉटसअॅप’ ग्रुपच्या माध्यमांतून पटवून देऊ शकतो.” हा आत्मविश्वास एका राजकीय पक्षाचे नेते म्हणून ठीक आहे, पण आज देशाची सूत्रे आपल्या हाती आहेत हे त्यांना विसरता येणार नाही. ज्या सोशल मीडियाने मनमोहन सिंग व राहुल गांधी यांना निकम्मे ठरवले, त्याच सोशल मीडियावर रिकाम्या बोगद्यात लष्करी गाडीवर उभे राहून आपले पंतप्रधान हात हलवत पुढे निघाले असल्याचा ‘व्हिडीओ’ व्हायरल झाला व पंतप्रधानांची प्रचंड खिल्ली उडवली गेली. हे बरोबर नाही. राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, सेनाप्रमुख, पोलीस यांना ‘टार्गेट’ करणे म्हणजे देशाच्या भवितव्याचा खड्डा खणण्यासारखे आहे,’ अशी शक्यता राऊत यांनी व्यक्त केली आहे.

‘सुशांतप्रकरणी एकट्या मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी ८० हजार फेक अकाऊंटस् निर्माण केली जातात. म्हणजे अशा प्रकारची किमान पाच कोटी फेक अकाऊंटस् सोशल मीडियावर सक्रिय आहेत. हे बेकायदेशीर काम कायद्यानेच थांबवायला हवे. देशाच्या गृहमंत्र्यांनी त्यात पुढाकार घ्यावा. सुरुवात स्वतःच्या पक्षापासून करावी लागेल,’ असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here