मुंबईः टेलिव्हिजन वाहिन्यांच्या ‘टीआरपी’मध्ये फेरफार करणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. यामध्ये रिपब्लिक या वृत्तवाहिनीसह फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या वाहिन्यांचा समावेश आहे. यानंतर बजाज ऑटोचे प्रमुख यांनीदेखील वाहिन्यांसंबधी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जाहिरातींसाठी तीन वाहिन्यांना ब्लॅकलिस्ट म्हणजेच काळ्या यादीत टाकण्यात आल्याची माहिती बजाज यांनी दिली आहे. मात्र, त्यांनी त्या वाहिन्यांची नावं घेणं टाळलं आहे.

मुंबई पोलिसांच्या तपासात टीआरपी रॅकेट उघडकीस आलं आहे. टीआरपी एजन्सीच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे रॅकेट चालवले जात होते. यात पैसे देऊन रेटिंग वाढवण्यात आल्याचे समोर आले आहे. ‘हंसा’ ही एजन्सी टीआरपी रेटिंग वाढवण्यासाठी या चॅनेल्सना मदत करत होती. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर बजाज यांनी या तीन वाहिन्यांवर बंदी घातली आहे.

‘सशक्त ब्रँड हा एक पाया आहे, ज्यावर आपण मजबूत व्यवसाय बनवतो. आमची कंपनी कोणत्याही द्वेषबुद्धीला आणि समाजात विष पसरवणाऱ्या मानसिकतेला मान्यता देत नसल्याचं,’ बजाज यांनी स्पष्ट केलं आहे. ‘आम्ही द्वेषबुद्धीनं काम करणाऱ्या वाहिन्या आणि वृर्तमानपत्राची नावं काढत आहेत. व्यवसायावर त्याचा कोणत्याही प्रकारे परिणाम झाला तरी आम्ही त्या माध्यमांचं समर्थन करु शकत नसल्याचंही,’ त्यांनी नमूद केलं आहे.

टीआरपी म्हणजे काय?

टीआरपी म्हणजे नक्की काय असते, त्याचे मोजमाप नक्की कसे केले जाते, याविषयी सामान्य लोकांमध्ये चर्चा सुरू आहे. टीआरपीच्या एका पॉईंटवर जाहिराविश्वात मोठे बदल घडू शकतात. याच टीआरपी रेटिंगवर टेलिव्हिजन वाहिन्यांना जाहिराती मिळतात. त्यामुळे टीआरपीचे आकडे हे वाहिन्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. ब्रॉडकॉस्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल इंडिया (बार्क) ही संस्था आपल्या व्यापक, देशव्यापी यंत्रणेव्दारे ‘टीआरपी’ची आकडेवारी गोळा करते. ज्यांना ही आकडेवारी हवी असते त्या व्यक्ती अथवा संस्थेला बार्कतर्फे वार्षिक शुल्क आकारले जाते. दर गुरुवारी त्या-त्या आठवड्याची आकडेवारी जाहीर होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here