म.टा. प्रतिनिधी, नगरः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी जनतेला संबोधित करताना नगर जिल्ह्यातील सुदाम जाधव या आरोग्य कर्मचाऱ्याचा उल्लेख केला. त्यामुळं हे जाधव आहेत, कोण आणि त्यांची असं काय केलं याकडे लक्ष लागले होते.

संगमनेर तालुक्यातील बोटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुदाम जाधव कार्यरत आहेत. सध्या माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन प्रत्येकाची तपासणी करायची आहे. अशी ही योजना असली तरी प्रत्यक्षात यात अनेक अडचणी आहेत. अनेक ठिकाणी पथकातील कर्मचारी योग्य काम करतातच असं नाही, तर कोठे लोक खरी माहिती देतातच असंही नाही.

अशा परिस्थिती सुदाम जाधव यांच्या तत्परतेमुळे एका महिलेचा जीव वाचला आहे. झालं असं की या मोहीमेत पथक बोटा गावात तापसणी करीत होतं. त्यामध्ये जाधवही याच कामात होते. यावेळी त्यांना या गावातील एक ६८ वर्षीय महिलेला ताप सर्दी व श्वास घेण्यास त्रास होत असल्याचं जाणवलं. जाधव यांनी तपासणी केली असता या महिलेची ऑक्सिजन पातळी ७८ टक्के आढळून आली.

तात्काळ त्यांनी पथकाचे प्रमुख डॉ. कापसे यांच्याशी संपर्क साधला. उपचार घेण्यासंबंधी रुग्ण महिला आणि कुटुंबाचे प्रबोधन करण्यात आलं. महिलेला तातडीनं संगमनेरच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये हलवून उपचार सुरू करण्यात आले. चाचणी करून घेण्यात आली. त्यात त्या महिलेला करोनाचा बाधा झाल्याचं आढळून आलं. त्यामुळे पुढील उपचार सुरू ठेवण्यात आले. आता त्या करोनातून बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जाधव यांचे या कामगिरीबद्दल कौतूक केले. सरकारच्या या योजनेचा हाच उद्देश आहे. त्यामुळं आरोग्य यंत्रणेमार्फत जाधव यांच्या या कार्याची नोंद घेण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही जाधव यांचा उल्लेख केला.

अहमदनगर जिल्ह्यात तालुकास्तरावर तालुका आरोग्य अधिकारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आशा कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांच्यासह यंत्रणा राबत आहे. ही यंत्रणा गावोगावी जाऊन नागरिकांशी संवाद साधत माहिती गोळा करत असून उपचार आवश्यक असणाऱ्या रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात येत आहे. यातील एक असलेल्या जाधव यांच्या कामाचे राज्यस्तरावर कौतूक झाल्यानं सर्वांनाच हुरूप आला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here