ramesh.khokrale@timesgroup.com

मुंबई : आज जगभरात सोशल मीडियाच्या प्रभावाचा पुरेपूर वापर करण्याचे प्रयत्न होत आहेत. अशावेळी आपल्या ज्ञानाचा व माहितीचा दावा करत यूट्युब चॅनेलच्या माध्यमातून माहिती प्रसारित करणाऱ्यांनी आपली जबाबदारीही ओळखणे गरजेचे आहे. आपण प्रसारित करत असलेली माहिती कोणासाठी अपायकारक नसेल किंवा ती आक्षेपार्ह नसेल याची खबरदारी त्यांनी घ्यायला हवी’, असे अत्यंत महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

सध्या सर्वत्र सोशल मीडियाच्या विविध माध्यमांचा जोरदार वापर होत आहे. त्यातून प्रचार-प्रसार केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर, न्या. एस. जे. काथावाला यांनी बुधवारी एका निकालात नोंदवलेले हे निरीक्षण महत्त्वाचे मानले जात आहे.

काय आहे प्रकरण?

अभिजीत भन्साळी या यूट्युबरने एका खासगी कंपनीचे तेल हे वाईट दर्जाचे असल्याचा दावा करणारा व्हिडीओ बनवून तो यूट्युबवर प्रसारित केला होता. त्याला या कंपनीने आक्षेप घेतल्यानंतरही तो काढण्यात आला नाही. त्यामुळे कंपनीने अॅड. हिरेन कमोद यांच्यामार्फत व्यावसायिक दावा दाखल केला. तसेच हा आक्षेपार्ह व्हिडीओ काढून टाकण्याचे निर्देश देण्याची विनंती करणारा अर्ज केला. या अर्जावरील सुनावणीअंती राखून ठेवलेला निर्णय न्या. काथावाला यांनी बुधवारी जाहीर केला. यूट्युब किंवा अन्य कोणत्याही सोशल मीडियावर कोणत्याही स्वरुपात असलेला हा आक्षेपार्ह व्हिडीओ काढून टाकण्याचा आदेश त्यात न्यायमूर्तींनी भन्साळी यांना दिला.

निकाल काय सांगतो?

‘सर्वसामान्य नागरिकाने कोणताही पूर्वग्रह न ठेवता मत व्यक्त करणे आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (प्रभाव पाडणारा) म्हणून मत व्यक्त करणे यात फरक आहे. अशा इन्फ्लुएन्सरना फॉलो (अनुसरण) करणारे हजारो किंवा लाखो लोक असू शकतात. त्यामुळे आपण एखाद्या वस्तू किंवा सेवेविषयी जो अभिप्राय मांडतो त्याने अनेकांवर प्रभाव पडतो, याची त्यांना असते. लोकांची मने प्रभावित करण्याची ताकद त्यांनी मिळवल्यानंतर त्यांच्यावर मोठी जबाबदारीही येते. त्यामुळे ते सर्वसामान्याप्रमाणे विधान करू शकत नाहीत. आपले विधान सत्यतेवर आधारित ठेवण्याची आणि आपल्या विधानाने लोकांची दिशाभूल होणार नाही, याची खबरदारी घेण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर येते. अशावेळी आपण प्रसारित करत असलेली माहिती ही अपायकारक किंवा आक्षेपार्ह नाही याची खबरदारी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने घेणे गरजेचे आहे’, असे निरीक्षण न्यायमूर्तींनी आपल्या निकालात नोंदवले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here