म. टा. प्रतिनिधी, : शेजारी राहणाऱ्या पती-पत्नीचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याला जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उर्मीला प्रशांत फड (वय ३२) यांनी याबाबत तक्रार दिली. त्यानुसार महेंद्र शिवराम कदम (वय ३३), रवींद्र शिवराम कदम (वय ३६) आणि सौरभ सुरेश जाधव (वय २०) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या शेजारी आरोपी महेंद्र कदम पत्नीसोबत राहतो. शुक्रवारी रात्री कदम हा चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला मारहाण करू लागला. त्यामुळे त्यांचा वाद सोडविण्यासाठी फड व त्यांचे पती गेले. त्या वेळी आरोपींनी कौटुंबिक भांडणात मध्ये कशाला पडता म्हणून फड दाम्पत्याला मारहाण केली, तसेच उर्मीला फड यांच्या मानेजवळ धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये त्या जखमी झाल्या. या प्रकरणी त्यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस अधिक तपास करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here