मुंबई : अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे मुंबई आणि उपनगरात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री यांनी गंभीर दखल घेतली आहे. तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी देखील मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आणि मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. दरम्यान, ९० टक्के भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं आहे.

भविष्यात परत अशी घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगावी असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबईतील संपूर्ण वीज जाण्याच्या घटनेमागे कोणते तांत्रिक दोष आहेत, तसेच कोण जबाबदार आहेत, त्याबाबत चौकशी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

दरम्यान सकाळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणे करून अडचण होणार नाही याबाबत महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या. या सर्व काळात वीज पुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे व तात्काळ मदत करावी असंही त्यांनी मुख्य सचिव आणि मंत्रालय नियंत्रण कक्षाला सांगितले.

लोकल रेल्वेला याचा फटका बसला असून तिथेही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. दरम्यान, वीज पुरवठा खंडित झाल्यानं ठप्प झालेली लोकलसेवादेखील आता पूर्वपदावर येतेय. हार्बर रेल्वेबरोबरच मध्य रेल्वेवर व पश्चिम रेल्वेही सुरू पुन्हा सुरळीत झाली आहे. त्याचबरोबर रस्त्यावरचे सीसीटीव्ही व सिग्नल यंत्रणाही पुन्हा सुरू झाली आहे. तब्बल दोन तासांच्या खोळंब्यानंतर मुंबईत काही प्रमाणात पुन्हा वर्दळ सुरू झाली आहे. काही शासकीय कार्यालयातही वीज पुरवठा सुरळीत सुरू झाला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here