मुंबईः मुंबईकरांची सोमवारची सकाळ काहीशी डोकेदुखीची ठरली आहे. अचानक वीज पुरवठा बंद झाल्यानं मुंबईकरांचा तब्बत दोन ते अडीच तास खोळंबा झाला आहे. विद्युत कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करत काही भागांतील वीज पुन्हा पुर्ववत केली आहे. मात्र, अद्यापही काही भागांत वीज पुरवठा सुरळीत झालेली नाहीये. संपूर्ण वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी संध्याकाळी पाचपर्यंत वेळ लागणार असल्याची शक्यता महापारेषणकडून वर्तवण्यात येत आहे.

महापारेषणच्या ४०० के. व्ही. कळवा-पडघा GIS केंद्रात सर्किट-१ ची देखभाल दुरूस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट-२ वर होता. मात्र, सर्किट-२ मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील काही भागात वीजपुरवठा खंडित झाला. मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या कळवा, पडघा, खारघर ट्रान्सफॉर्मर वाहिनी बंद झाल्या. मुंबई व मुंबई उपनगरचा २२०० मेगावॅट वीजपुरवठा खंडित झाला. उरण वायू विद्युत केंद्रातील सर्व संच एससी बिघाड झाल्याने बंद झाला. खारघर-तळोजा वाहिनी बंद झाली. दरम्यान, महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने ती वाहिनी पूर्ववत केली आहे. दरम्यान, कळवा-खारघर येथील जंपर ब्रेकडाऊन झाला असून तो दुपारी अडीच वाजता सुरू करण्यात आला आहे, असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

४०० के. व्ही. कळवा-तळेगाव पॉवरग्रीड वाहिनीत १० ऑक्टोबरला दुपारी १ वाजून ४७ मिनिटाला बिघाड झाला होता. तर, ४०० के. व्ही. पडघा-कळवा वाहिनी-१ ही १२ ऑक्टोबरला पहाटे ४ वाजून ३३ मिनिटाला ओव्हर व्होल्टेजमुळे बंद झाली. त्यामुळं इन्सुलेटर बदलण्यासाठी सदर वाहिनी बंद ठेवण्यात आली होती. ४०० के. व्ही. पडघा-कळवा वाहिनी-२ सकाळी १० वाजून १ मिनिटांनी डिस्टन्स प्रोटेक्शन बिघाड झाल्याने बंद झाली. मनोरा लोकेशन क्रमांक-१००७ येथे वाहिनी तुटून पडली होती. मोठ्या प्रमाणात ठिणग्या आढळून आल्याने ४०० के. व्ही. तळेगाव पॉवरग्रीड- वाहिनी खारघर येथून सकाळी १० वाजून २ मिनिटांनी बंद करण्यात आली. यामुळे कळवा व खारघर येथील ४०० के. व्ही. च्या दोन्ही बस शून्य भारीत (Zero Load) झाल्या. ज्यामुळे मे. टाटाकडून संच क्र. ५ (५०० मेगावॉट) चा वीजपुरवठा बंद झाला. तसेच बोईसर पॉवरग्रीड ची २२० के. व्ही. पुरवठा वाहिनी क्र. ३ सुध्दा सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी बंद झाली. त्यामुळे टाटा यांचा सुमारे ५७० मेगावॉट व मे. बेस्ट यांचा ४४० मेगावॉट वीजभार बंद झाला. यामुळे अदानी यांच्या परिक्षेत्रातील ७०० मेगावॉट वीजभार बंद झाला.
वीजपुरवठा सुरळीत करण्याचे कामसुध्दा युध्दपातळीवर सुरू आहे. ट्रॉम्बे बस ऊर्जित केली असून वीज निर्मिती सुरू करण्यात येत आहे. तसेच रेल्वेचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे, अशी माहिती महापारेषणकडून देण्यात आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here