म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

चेहऱ्यावर मास्क न लावताच बेफिकिरीने फिरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून त्यांच्यामुळे करोनाचा संसर्ग आणखी वाढतो आहे. मुंबईत थोडेथोडके नव्हे दररोज तब्बल वीस हजार नागरिक फिरताना आढळून येत असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात असल्याची माहिती दस्तुरखुद्द पालिका आयुक्त यांनी दिली आहे.

पालिकेने गणेशोत्सवापासून लॉकडाउनमध्ये शिथिलता आणली. त्यामुळे नागरिकांच्या गाठीभेटी वाढल्या. परिणामी मागील दीड ते दोन महिन्यांपासून मुंबईत करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. दररोज एक हजारांहून अधिक रुग्ण सध्या दररोज वाढत आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांमुळे संसर्ग पुन्हा फैलावत असल्याचे आढळून आल्याने पालिकेने मास्क न लावणाऱ्यांविरूद्ध जोरदार कारवाई सुरू केली आहे.

चेहऱ्यांवर मास्क नसेल तर सार्वजनिक वाहतूक व्‍यवस्‍थेतील बेस्ट बस, रिक्षा, टॅक्‍सी तसेच सोसायट्या, मॉल्स व कार्यालयांमध्ये प्रवेश दिला जात नाही. ‘मास्‍क नसल्‍यास प्रवेश मिळणार नाह‍ी’, अशा आशयाचा मजकूर असणारे स्‍टीकर्स संबंधित ठिकाणी लावण्‍यात आले आहेत.

पालिकेने मागील पाच महिन्यांपासून सुरू केलेल्या विनामास्क कारवाईत आतापर्यंत सुमारे सात हजार गुन्हे नोंदविण्यात आले असून ६० लाखांहून अधिक रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.

जबाबदारीने वागण्याचे आवाहन

सुरूवातीला विनामास्क कारवाईत एक हजार रुपये दंड आकारला जात होता. हा दंड जास्त असून कमी करण्याची विनंती पालिकेला करण्यात आल्यानंतर हा दंड आता २०० रूपये करण्यात आला आहे. दंडात्मक कारवाईचा बडगा उगारल्यानंतरही अनेकांची बेफिकिरी सुरूच असल्याने विनामास्क मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे. मास्कशिवाय फिरणाऱ्या २० हजार जणांना दररोज दंड करण्यात येत आहे. त्यामुळे करोना रोखण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने वागावे, खबरदारी घ्यावी आणि मास्कचा वापर करावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here