म. टा. प्रतिनिधी,

मुंबईला सोमवारी सकाळी विजेचा फटका बसला असला, तरी तो बिघाड शनिवारपासूनच होता. त्यानंतर एकेक कंडक्टर बंद पडत गेले. राज्य भार वितरण केंद्रदेखील परिस्थिती योग्यवेळी हाताळू शकले नाही आणि भार येऊन संपूर्ण ग्रीड ढासळली.

मुंबई शहर व उपनगरात प्रामुख्याने अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (एईएमएल), टाटा पॉवर व बेस्टकडून विजेचा पुरवठा होतो. भांडुप ते मुलुंड परिसरात तसेच तेथून पुढे ठाणे, नवी मुंबईत महावितरणाकडून पुरवठा केला जातो. मुंबईला जेवढी वीज लागते, त्यातील साधारण ४५ टक्के वीज अदानी पॉवर व टाटांच्या प्रकल्पात तयार होते. उर्वरित वीज मुंबईबाहेरून घेतली जाते. या बाहेरून येणाऱ्या विजेचे मुख्य केंद्र पडघा (आसनगावजवळ) येथे आहे. पडघ्याहून दोन वेगवेगळ्या मोठ्या वाहिन्यांद्वारे (सर्किट) वीज कळव्याला येऊन पुढे मुंबईत तिचे वितरण होते. पडघ्याला शनिवारीच बिघाड झाला होता व तेथून पुढे असा मोठा गोंधळ उडाला.

राज्यात विद्युत वाहिन्यांमार्फत वीज पोहोचविण्याचे काम करणाऱ्या राज्य सरकारच्या महापारेषणच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पडघा ते कळवा व पुढे कळवा ते खारघर अशा दोन मोठ्या वाहिन्या बंद झाल्याने खोळंबला हे खरे असले तरी, वेळेतच मुंबईची वीज प्रणाली वेगळी झाली. त्यानंतर वीज हळुहळू प्रवाह सुरळीत होऊ लागला. परंतु टाटा पॉवरचा ५०० मेगावॉटचा संच बंद पडल्याने मुंबईच्या सुमारे १७०० मेगावॉट विजेला फटका बसला.’

वीज प्रवाह हळुहळू पूर्ववत झाल्यानंतर सुरुवातीला रेल्वे व रुग्णालयांना वीज देण्यात आली. तरीही दुपारी ४ वाजतापर्यंत केवळ ७० टक्के भागातील वीज प्रवाहच सुरळीत झाला होता, तर ३० टक्के भागातील वीज येण्यास विलंब झाला.

असा झाला बिघाड-

१० ऑक्टोबर

दुपारी १.४७ : कळवा-तळेगाव वाहिनी १ कंडक्टर तुटल्याने बाधित

१२ ऑक्टोबर

पहाटे ४.३३ : पडघा-कळवा वाहिनी १ ओव्हर व्होल्टेजमुळे बंद

पहाटे ४.४५ : पडघा-कळवा वाहिनी १ बंद करण्यात आली

सकाळी ७ : पडघा-कळवा वाहिनी १ च्या दुरुस्तीचे काम सुरू

सकाळी १०.०१ : पडघा-कळवा वाहिनी २ भार वाढून बंद (मुंबईत बाहेरून येणारी वीज जवळपास बंद)

सकाळी १०.०१ : मुंबईला पुरवठा करणाऱ्या चारपैकी तीन वाहिन्या बंद

सकाळी १०.०२ : उर्वरित एक वाहिनी अतिरिक्त स्पार्किंगमुळे बंद पडली, एकेका भागातील वीज जात ग्रीड ढासळली

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here