म.टा. प्रतिनिधी, नगर: काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते डॉ. यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते थोड्याच वेळात होणार आहे. या कार्यक्रमात मोदी काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. स्वत: मोदी यांनी काल रात्री ट्विट करून हा कार्यक्रम नक्की पहा, असे म्हटले आहे.

व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यासंबंधी त्यांनी काल रात्रीच ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘मी उद्या सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून श्री बाळासाहेब विखे पाटील यांचे आत्मचरित्र प्रकाशित करणार आहे. कृषी आणि सहकारक्षेत्र मजबूत करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न नेहमी स्मरणात राहतील. हा कार्यक्रम नक्की बघा.’

या कार्यक्रमाचे निमित्त साधून मोदी अलीकडे केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यासंबंधी बोलतील. हे कायदे कसे उपयुक्त आहेत, याची माहिती शेतकऱ्यांना देण्याची संधी ते नक्कीच सोडणार नाहीत. ‘मोदी आणि विखे पाटील यांचे मित्रत्वाचे संबंध होते, मात्र, आमच्या वडिलांनी ही माहिती आम्हाला कधीच सांगितली नाही. निमंत्रण द्यायला गेलो, तेव्हा मोदी यांनीच हे सांगितले,’ असे वक्तव्य माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अलीकडेच केले होते. त्यामुळे मोदी या दोस्तीवरही काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे.

बाळासाहेब विखे काँग्रेसचे कट्टर कार्यरर्ते होते. राजीव गांधी यांच्या काळात त्यांनी नेतृत्व कसे असावे, यासंबंधी सल्ला देण्याचा आणि त्यासंबंधी एक गट स्थापन करण्याचा प्रयत्न केल्याने पुढे त्यांना काँग्रेस सोडावी लागली होती. त्यानंतर ते आणि मुलगा राधाकृष्ण दोघेही शिवसेनेत गेले. तेथे त्यांना केंद्रात आणि राज्यातही मंत्रिपद मिळाले. मात्र, विखे पिता-पुत्र शिवसेनेत रमले नाहीत. ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. आयुष्याची सायंकाळ काँग्रेसमध्येच व्हावी, असा विचार डॉ. विखे पाटील यांनी बोलून दाखविला आणि शेवटपर्यंत ते काँग्रेसमध्येच राहिले. त्यांच्या एकूण राजकीय कारकीर्दीत त्यांचा भाजपशी संबंध आला नाही. आता मात्र, त्यांचा मुलगा आणि नातू भाजपमध्ये असल्याने त्यांचे भाजपकडून कौतूक केले जात आहे.

जुन्या आणि बऱ्याच अंश नव्या पिढीतही बऱ्यापैकी स्थान असलेल्या डॉ. विखे पाटलांना भाजपशी जोडून घेण्याचा पक्षाचा प्रयत्न दिसतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मोदी यांच्याकडून त्यांचे कौतूक होऊन यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here