मुंबई: ‘आज के शिवाजी: नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून शिवसेना-भाजपमध्ये सुरू झालेलं शब्दयुद्ध थांबण्याचे नाव घेत नाहीए. ‘उदयनराजे यांच्या तंगड्या तोडण्याच्या धमकीला शिवसेनेचे खासदार यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. ‘छत्रपतींचे वंशज म्हणून आम्ही तुमचा आदर करतो. पण तंगड्या तोडण्याची भाषा योग्य नाही. तंगड्या प्रत्येकाला असतात,’ असं राऊत यांनी उदयनराजेंना सुनावलं आहे.

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी आपली भूमिका मांडली. ‘आज के शिवाजी: नरेंद्र मोदी’ पुस्तकाबद्दल भाजपमध्ये असलेल्या शिवरायांच्या वंशजांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राऊत यांनी केली होती. त्यावर पक्षाचं नाव ठेवताना वंशजांना विचारलं होतं का, असं उदयनराजे यांनी म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना राऊत यांनी उदयनराजेंकडून वंशज असल्याचे पुरावे मागितले. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकारण तापलं आहे. उदयनराजे यांनी नाव न घेता राऊत यांना इशारा दिला होता. राऊत यांनी आज त्यांना प्रत्युत्तर दिलं. ‘छत्रपतींच्या घराण्याबद्दल आम्हाला कायम आदर आहे. या घराण्यातील अनेक लोक शिवसेनेशी जोडलेले होते. कोल्हापूरचे संभाजीराजे, साताऱ्याचे शिवेंद्रराजे ही सगळी संयमी व्यक्तिमत्त्वं आहेत. उदयनराजेंच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले या तर शिवसेनेतच होत्या. शिवसेनेचे सर्वांशीच जवळचे संबंध राहिले आहेत. पण कुणी एखाद्या घराण्यात जन्मला म्हणून त्यांना महाराष्ट्रातील इतर श्रद्धास्थानांवर बोलण्याचा अधिकार मिळत नाही. शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कुणी काहीही बोलत असेल तर त्यांना उत्तर द्यायचा अधिकार आम्हाला आहे,’ असं राऊत म्हणाले.

वाचा:

‘तंगड्या तोडण्याची भाषा आम्ही कधीच केली नव्हती. कुणी तशी भाषा करत असेल तर लोकशाहीत ते चालत नाही. तंगड्या प्रत्येकाला असतात. सामान्य नागरिकही तुम्हाला उत्तर देऊ शकतात. लोक पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही प्रश्न विचारतात. १० ते १५ लोक छत्रपतींचे वंशज असू शकत नाहीत. महाराष्ट्रातील ११ कोटी जनता शिवरायांची वंशज आहे. त्यामुळं तुम्ही आम्हाला आदर द्या, आम्ही तुम्हाला आदर देऊ,’ असं ते म्हणाले.

वाचा:

भाजपकडून होत असलेल्या टीकेची राऊत यांनी खिल्ली उडवली. ‘भाजपवाले विरोधात आहेत. ते त्यांचं काम करताहेत. भाजपचे वरिष्ठ नेते मानत नसले तरी आम्ही विरोधकांचं स्वातंत्र्य मानणारे आहोत. त्यामुळं भाजपला जे करायचं ते करू द्या,’ असं ते म्हणाले. ‘सत्ता गेल्यावर माणसाला वैफल्य येतं. पण ते इतकं टोकाचं नको की आपल्या श्रद्धास्थानावर कुणी बोललं तरी त्याकडं दुर्लक्ष व्हावं. उदयनराजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘पेढेवाले’ म्हणाले होते. त्यांना चंद्रकांत पाटलांनी कधी जाब विचारला का,’ असा सवालही राऊत यांनी केला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here