मंगळवारी (ता. १३) सकाळी ७ वाजताच्या सुमारास बनकर चौक येथील शिवनेरी अपार्टमेंटमधील एका रहिवाशाने मुख्य अग्निशमन विभागाच्या कार्यालयात फोनद्वारे गॅसचा भडका उडून आग लागल्याची माहिती दिली. मुख्य अग्निशमन अधिकारी श्याम राऊत, अग्निशमन अधिकारी किशोर पाटील, विजय शिंदे, राजेंद्र पवार, उदय शिर्के आणि वाहनचालक शरद देटके हे अग्निशमन बंबासह घटनास्थळी पोहोचले. या आगीत अली अख्तर (वय ५०), रुबीना अख्तर (वय ४५), रमजान अख्तर (वय २८) आणि रुक्साना अख्तर (वय २५) हे चौघे होरपळले. हे सर्व जण घरातील किचन ओट्यासमोरच उभे होते. गॅसच्या भडक्यानंतर या चौघांनी बचावासाठी आरडाओरड केली. ते ऐकून परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले.
नागरिकांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले. घरावर पाण्याचा मारा केला. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यात मदत झाली. दरम्यान, या कुटुंबाचा कांदा-लसूण विक्रीचा व्यवसाय असून लहानशा खोलीत कांदा व लसणाची पोती होती. रात्री घरातील महिलेकडून गॅस सिलिंडरचे बटन बंद करण्याचे राहून गेले. सकाळी शेगडी पेटवताना भडका उडाला. आजूबाजूच्या रहिवाशांनी वेळीच धाव घेतल्याने मोठी हानी टळली. जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times