म. टा. प्रतिनिधी, जळगावः माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांवर उघड आरोप करणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची जोरदार चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर खडसे- फडणवीस यांची जामनेर येथे माजी मंत्री गिरिश महाजन याच्या पाठपुराव्यात सुरु करण्यात आलेल्या हॉस्पिटलच्या लोकार्पणातील संभाव्य भेट टळली आहे. खडसे यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती न देता गिरिश महाजन यांना फोनवरुन शुभेच्छा देत भेटीचा प्रसंग टाळला.

गेल्या काही वर्षापासून आपल्यावर पक्षातंर्गत अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरच आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. तेव्हापासून खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची चर्चा सुरु झाली आहे. नेमके याच काळात जामनेर येथे गिरीश महाजनांच्या पुढाकाराने उभारलेल्या ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटलचे लोकार्पण आज मंगळवारी फडणवीस यांच्या हस्ते होत असल्याने गिरिश महाजनांनी त्यासाठी खडसेंनाही निमंत्रण दिले होते, त्यामुळे त्याठिकाणी खडसे- फडणवीस भेटीबाबत उत्सुकता लागून होती. मात्र, खडसे यांनी मंगळवारी दुपारीच जामनेरला जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

खडसे प्रत्यक्ष गेले नसले तरी त्यांनी महाजनांना फोन करुन या प्रकल्पाबाबत शुभेच्छा दिल्या. हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील जनतेसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपाच्या आंदोलनालाही अनुपस्थिती

राज्यभरात भाजपने मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी आज मंगळवारी राज्यव्यापी आंदोलन केले. जळगाव जिल्ह्यातही प्रत्येक ठिकाणी हे आंदोलन झाले. मुक्ताईनगर तालुक्यात कोथळीच्या जुन्या मंदिरस्थळी भाजपने खासदार रक्षा खडसे, डॉ. राजेंद्र फडके यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. मात्र, एकनाथ खडसे व त्यांच्या समर्थकांची या आंदोलनातील अनुपस्थितीही चर्चेचा विषय ठरली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here