म. टा. प्रतिनिधी, : तालुक्यातील येथील खोलीकरण झालेल्या खारी नदी पात्रात बुडून दोन बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना आज, मंगळवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. त्या दोघी अधिक मासात महादेव मंदिरात दर्शनासाठी जाण्याआधी नदीवर स्नान करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली.

या प्रकरणी देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, खामगाव पंचक्रोशीत या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आरती कैलास कवडे (वय २२) व ऋतुजा शिवाजी कवडे (वय १८) अशी मृत्यू झालेल्या या सख्ख्या चुलत बहिणींची नावे आहेत. मंगळवारी सकाळी अधिक मासानिमित्त गावातील महिला सकाळी महादेव मंदिरात देव दर्शनासाठी व नदी पात्रात स्नान करण्यासाठी जात असत. त्यांच्यासोबत या बहिणीही स्नान करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी एका मुलीचा पाय घसरून ती पडली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात दुसरी मुलगीही नदी पात्रात बुडाली.

या घटनेबाबत गावात समजल्यानंतर ग्रामस्थांनी व कुटुंबीयांनी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने दोघींचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. औराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कांबळे व डॉ. शरयु चव्हाण यांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून ते नातेवाईकांच्या ताब्यात दिले. मंगळवारी दुपारी दोन वाजता शोकाकूल वातावरणात दोघींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास देवगाव रंगारी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार पी. एस. आव्हाळे, विजय धुमाळ हे करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here