नवी दिल्ली: हाथरस प्रकरणावरून ( ) अलाहाबाद उच्च न्यायालयाने युपी पोलिसांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. पीडितेवर रातोरात अंत्यसंस्कार करून तिच्या आणि तिच्या कुटुंबीयांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन केले गेले, असं अलाहाबाद उच्च न्यायालयाने सुनावलं आहे. पीडित तरुणी धार्मिक प्रथांनुसार किमान अंत्यसंस्काराची हकदार होती, असं अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने म्हटलंय. हाथरस प्रकरणी सोमवारी खंडपीठात सुनावणी झाली.

हाथरसमधील पीडितेच्या चारित्र्या हननाच्या प्रयत्नात कुणीही सामील व्हायला नकोय. यासह न्यायालयात खटला सुरू असताना निष्पक्ष सुनावणीपूर्वी आरोपींना दोषी ठरवलं जाऊ नये, असं न्यायालयाने स्पष्ट केलं. हाथरस प्रकरणाची न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली आहे.

युपीच्या हाथरसमधील एका गावात १९ वर्षांच्या दलित तरुणीवर कथित सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर दिल्लीतील रुग्णालयात पीडित तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या खटल्याची सुनावणी लखनऊ खंडपीठात सुरू आहे.

पीडितेच्या कुटुंबाच्या जागी एखादा धनाढ्य व्यक्ती असती तर तुम्ही अशा प्रकारे मृतदेह जाळला असता, असं न्यायालयाने म्हटल्याचं पीडित कुटुंबाच्या वकील सीमा कुशवाहा यांनी सोमवारी सांगितलं होतं. यावर हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तर दिलं. पीडित तरुणीवर रात्रीच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय आपला होता, असं जिल्हाधिकारी म्हणाले. पोस्टमार्टमनंतर पीडितेचा मृतदेह १० तास दिल्लीत होता. गावात गर्दी वाढत होती आणि कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा धोका होता. यामुळे अंत्यसंस्कार केले गेले, असं ते म्हणाले. पोलिस सुरक्षा वाढवून तरुणीच्या पार्थिवावर सकाळी अंत्यसंस्कार करता आले नसते का? असा प्रश्न यावर न्यायालयाने प्रशासनाला केला. न्यायालयाने स्वत: या प्रकरणी दखल घेतली असून संपूर्ण प्रकण संवेदनशीलतेने समजून घेण्यात येत आहे.

शेवटपर्यंत आम्हाला मुलीचा चेहरा पाहू दिली नाही आणि बळजबरीने तिचे पार्थिव जाळण्यात आले, असा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी कोर्टात केला. यावरून न्यायालयाने जिल्ह्याधिकाऱ्यांना सवाल केला. जर ती एखाद्या धनाढ्याची मुलगी असती तर तिच्यावर तुम्ही असं अंत्यसंस्कार केले असते का? असं न्यायालयाने विचारलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here