म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः ज्या नगरपालिकेत पत्नी नगराध्यक्षा आहेत, त्याच कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदावर त्यांचे पतीराज विराजमान झाले. पती आणि पत्नी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष होण्याचा जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. यामुळे राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

गडहिंग्लज नगरपालिकेत गेल्या अनेक वर्षापासून जनता दलाची सत्ता आहे. सध्या जनता दलाच्या स्वाती कोरी या नगराध्यक्षा आहेत. चार वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत त्या जनतेतून निवडून आल्या. नगरसेविका म्हणून तीनवेळा त्या निवडून आल्या असल्या तरी त्यांचे पती महेश मात्र राजकारणापासून चार हात लांब असत. पडद्यामागून सर्व सूत्रे हलवत पत्नीला ताकद देणाऱ्या या पतीराजांनी दहा महिन्यापूर्वी नगरसेवकपदाची निवडणूक लढवली. शहराची हद्दवाढ झाल्याने ही वाढीव मतदारसंघाची निवडणूक झाली. त्यांच्या विजयाने पालिकेत जनता दलाची ताकद वाढली.

सध्या या नगरपालिकेत जनता दल, शिवसेना व भाजपची युती आहे. जनता दलाचे १३ तर इतर दोन्ही पक्षाचा एकेक सदस्य आहे. राष्ट्रवादी पक्षाचे पाच नगरसेवक असून तो विरोधी भूमिकेत आहे. शंकुतला हातरोटे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महेश कोरी यांनी अर्ज भरला. नगराध्यक्ष स्वाती कोरी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन झालेल्या बैठकीत मतदान घेण्यात आले. त्यामध्ये कोरी यांना १५ तर विरोधी उमेदवार सावित्री पाटील यांना पाच मते मिळाली. यामुळे कोरी यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांच्या विजयाने पत्नी नगराध्यक्ष असलेल्या पालिकेत पती उपनगराध्यक्ष म्हणून विराजमान झाले. पंधरा वर्षापूर्वी कोल्हापूर महापालिकेत बंडोपंत नाईकवडे महापौर तर सुलोचना नाईकवडे उपमहापौर झाल्या होत्या. त्यानंतर नगरपालिकेत पती आणि पत्नी दोघेही पदाधिकारी होण्याचा मान कोरी दांपत्यांनी मिळवला.

तेवीस वर्षे आम्ही दोघं सुखानं संसार करत आहोत. आता गडहिंग्लज पालिकेचा एकत्र कारभार करायचा आहे. पत्नीच्या हातात हात घालून या शहराला विकासाचा चेहरा देण्यात येईल.
– महेश कोरी, उपनगराध्यक्ष

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here