म. टा. प्रतिनिधी, सांगली: सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींसह नऊ संचालकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर फोडाफोडीच्या राजकारणावरून काँग्रेस आणि आमने-सामने आले आहेत. फोडाफोडी करताना मित्रपक्षांनी तत्त्वांचे पालन करायला हवे, असे मत काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम यांनी व्यक्त करीत जलसंपदा तथा पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. तर आघाडीत बिघाडी करण्याची सुरुवात काँग्रेसनेच केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय बजाज यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात राष्ट्रवादीने काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना राष्ट्रवादीत घेण्यासाठी रेडकार्पेट अंथरले आहे. काही महिन्यांपूर्वी खानापूर-आटपाडी मतदार संघाचे माजी आमदार सदाशिव पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील यांनाही राष्ट्रवादी प्रवेशाचे आमंत्रण दिले होते. अखेरच्या क्षणी हा पक्ष प्रवेश बारगळला. तर गेल्या आठवड्यात बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांच्यासह नऊ संचालकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यानंतर रविवारी काँग्रेसचे सांगली शहर अध्यक्ष अजित दुधाळ यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे काँग्रेसला धक्के बसले आहेत.

राष्ट्रवादीच्या या धोरणावर काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम यांनी टीका केली. ते म्हणाले, ‘राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाविकास आघाडी आहे. राष्ट्रवादीने आघाडी धर्माला जागावे. प्रत्येकांनी पक्ष वाढवावा. आमची काही हरकत नाही. मात्र, आघाडीतील पक्षाचे कार्यकर्ते व नेते फोडणे चुकीचे आहे. आघाडीत काही तत्त्वाचे पालन होणे आवश्यक आहे. मित्र पक्षातीलच लोक फोडून पक्ष मोठा करणे हा प्रकार चुकीचा आहे.’

दरम्यान, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय बजाज यांनी काँग्रेसवर पलटवार केला. याबाबत बोलताना बजाज म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच आघाडी धर्माचे पालन केले आहे. परंतु, काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही कार्यकर्त्यांचा आधीच प्रवेश करून घेतला आहे. त्यामुळे सुरुवात त्यांच्याकडूनच झाली आहे. हे आमदार मोहनराव कदम कसे विसरतात? राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी आहे. या आघाडीची सर्व धोरणे आणि नियम राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच पाळत आहे. जिल्ह्यात आघाडीत बिघाडी करण्याचे काम काँग्रेसने आधी सुरू केले.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here