जामखेड तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून जोरदार पाऊस कोसळत आहे. तालुक्यातील सर्व तलाव, नदी, नाले व बंधारे ओसंडून वाहत आहेत. चौंडी येथील सीना नदीला देखील पूर आला असून, येथील केटी वेअर बंधारा ओसंडून वाहत आहे. काल, मंगळवारी सायंकाळी येथील तुषार गुलाबराव सोनवणे (वय २२) आणि त्याचा चुलता सतीश बुवाजी सोनवणे (वय ४३) व आणखी एक जण असे तिघे मासे पकडण्यासाठी या बंधाऱ्यावर गेले होते. चुलता व पुतण्या हे या केटीवेअर बंधाऱ्याच्या खालच्या बाजूला मासे पकडत होते; तर त्यांच्यासोबत आलेला एक जण हा बंधाऱ्याच्या काठावर बसला होता. याच दरम्यान पाण्याचा प्रवाह वेगाने आला. यात चुलता व पुतण्या हे पाण्यात पडून वाहून गेले. ही घटना काठावर बसलेल्या मुलाने पाहिली. तो गावात गेला आणि ही घटना सांगितली. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील हे पथकासह घटनास्थळी धावून गेले.
रात्र झाल्याने शोधकार्यात अडथळे येत होते. शोध घेऊनही ते सापडले नाहीत. अखेर रात्री उशिरा शोधकार्य थांबवण्यात आले होते. आज सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू केली असता, बंधाऱ्याच्या काठावर तुषार आणि सतीश यांचे मृतदेह पात्रात तरंगताना आढळून आले. दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. ते शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times