मुलुंडच्या विजयनगर परिसरात दुकानाबाहेर झोपलेल्या मारुती गवळी (७०) यांची २ ऑक्टोबर रोजी धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्येष्ठ नागरिकाची हत्या करण्यात आल्याने परिसरात घबराट पसरली होती. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतील अधिकाऱ्यांची पाच पथके तयार केली. ही अहोरात्र काम करीत होती, मात्र हत्या करणारे आरोपी कोण आहेत, याचे धागेदोरे हाती लागले नव्हते. पोलिसांनी मुलुंडचा परिसर पिंजून काढत एकेक घरात जाऊन चौकशी केली. त्याचवेळी याच परिसरात राहणारे दीपक मोरे आणि विनोद मोरे हे दोघे भाऊ वडिलांच्या निधनाने व्यथित असल्याचे समजले. पोलिसांनी या दोन भावांवर लक्ष केंद्रित केले. मोरे यांच्या वडिलांच्या अंत्यविधीला समाजातील कुणीच आले नव्हते. तसेच कुणी दुखवटा देखील व्यक्त केला नव्हता. त्यातच समाजातील तसेच परिसरातील लोकांनीच करणी केल्यामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याची त्यांचा समज झाला. समाजातील एका व्यक्तीने वडिलांच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी बळी द्यावे लागतील असे त्यांना सांगितले होते.
वडिलांच्या निधनामुळे व्यथित झालेले दीपक आणि विनोद अंधश्रद्धेला बळी पडल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता मारुती गवळी यांच्या हत्येत त्यांचाच सहभाग असल्याचे कळले. गवळी यांच्या हत्येसाठी त्यांनी येथील चौघांना ७० हजारांची सुपारी दिली होती. ही माहिती हाती येताच पोलिसांनी घाटकोपरच्या रमाबाई नगरातून एकाला तर, गोवंडी येथून तिघांना अटक केली. आसिफ शेख, मोईनुद्दीन अन्सारी, आरिफ खान, शाहनवाज शेख अशी मारुती गवळी यांची हत्या करणाऱ्यांची नावे आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times