कोल्हापूरः लॉकडाऊन सैल होताच परदेशातून वाढलेल्या मागणीनुसार पुरवठा करण्यास कोल्हापुरी गूळ कमी पडला. त्यामुळे कर्नाटकी गूळच ‘कोल्हापुरी’ नावाने निर्यात झाली, तब्बल एक हजार मेट्रिक टनापेक्षा अधिक गूळाची निर्यात झाल्याने शेतकऱ्यांच्या उलाढालीचा गोडवा वाढला. यामुळे नव्या हंगामात कोल्हापुरी गूळ परदेशात पाठवण्यासाठी आत्तापासूनच नियोजन सुरू करण्यात आले आहे.

कोल्हापूरातून दरवर्षी साधारणत: सातशे ते आठशे मेट्रिक टन गूळ जगातील विविध देशात पाठवला जातो. यामध्ये आखाती देशाबरोबरच इंग्लंड, अमेरिका, आस्ट्रेलिया व कॅनडा या देशांचा समावेश आहे. कोल्हापुरी गूळ अतिशय दर्जेदार असल्याने त्याला चांगली मागणी आहे. येथे उत्पादित झालेला ऐंशी टक्के गूळ गुजरात आणि राजस्थान जातो. गतवर्षी आलेल्या महापुरामुळे आणि कमी ऊस लागवडीमुळे त्याचे उत्पादन कमी झाले होते. मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केल्याने तो परदेशात फारसा पाठवता आला नाही. त्यामुळे देशातील काही राज्यातच तो पोहोचवला गेला.

लॉकडाऊन सैल होताच परदेशातून कोल्हापुरी गुळाला मागणी वाढली. पण पुरवठा करण्यासाठी तो उपलब्ध नव्हता. तेव्हा ‘कर्नाटकी’लाच ‘कोल्हापुरी’चे लेबल लावत तो पाठवण्यात आला. गेल्या काही वर्षाच्या तुलनेत यंदा मागणी वाढल्याने तब्बल एक हजार मेट्रिक टनापेक्षा अधिक गुळाची निर्यात करण्यात आली. यामुळे तब्बल पाच कोटीपेक्षा अधिक रक्कमेची उलाढाल या निर्यातीमुळे झाली. कोल्हापूर, सांगली, कराड व पुण्यातून मोठ्या प्रमाणात परदेशात गुळाची निर्यात होते. या भागात उत्पादित होणारा गूळ हा कोल्हापुरी म्हणूनच ओळखला जातो. पण तो कमी पडल्याने कर्नाटकातून व सांगली बाजार समितीत आलेल्या गुळाची निर्यात करण्यात आली. त्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या उलाढालीचा गोडवा वाढला.

परदेशात केमिकल विरहित गुळाला मोठी मागणी असते. यावर्षी कोल्हापुरात ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. यामुळे गुळाचे उत्पादन वाढणार आहे. अधिकाधिक गूळ निर्यात करण्यासाठी आत्तापासूनच नियोजन करण्यात येत आहे. नोव्हेंबरपासून अडीचशेपेक्षा अधिक गुऱ्हाळघरे सुरू होण्याची शक्यता आहे

गूळ निर्मिती

४० लाख टन

वार्षिक उलाढाल

३०० ते ३२५ कोटी

परदेशात निर्यात

एक हजार मे.टन.

दर

३५०० ते ४५०० क्विंटल

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here