पुणे: शहर आणि परिसराला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळीतील चार प्रमुख धरणांच्या परिसरात बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर अधिक आहे. संततधार अशीच राहिल्यास खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सावधानता बाळगण्याचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील गावात पुराच्या वेढ्यात ५५ जण अडकले असून त्यातील ४० जणांना सुखरूपपणे बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे तर १५ जण अजूनही अडकून पडले आहेत. इंदापूरजवळ दोन जण वाहनासह वाहून गेले मात्र वेळीच मदत मिळाल्याने ते बचावले आहेत. ही माहिती बारामतीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली. ( Latest Updates )

वाचा:

खडकवासला धरण साखळीतील वरसगाव, पानशेत खडकवासला आणि टेमघर या चारही धरणांच्या परिसरात बुधवारी दिवसभर फारसा पाऊस पडला नाही. खडकवासला धरण परिसरात एक मिलिमीटर, पानशेत आणि वरसगाव या धरणांच्या क्षेत्रांत प्रत्येकी दोन मिलिमीटर आणि टेमघर धरण परिसरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत तीन मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या चारही धरणांच्या परिसरात रात्री आठ वाजल्यानंतर पावसाला सुरुवात झाल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

पानशेत आणि वरसगाव ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. खडकवासला धरण हे सुमारे ८० टक्के आणि टेमघर धरण हे सुमारे ९८ टक्के भरले आहे. पानशेत आणि वरसगाव या धरणांमध्ये पावसाचा जोर कायम राहिल्यास या धरणांतून खडकवासला धरणात पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुठा नदीकाठाजवळील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे.

वाचा:

पवना नदीकाठच्या रहिवाशांनाही इशारा

पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली असून, पावसाचे प्रमाण वाढल्यास या धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पवना नदीकाठाजवळील रहिवाशांनी खबरदारी घ्यावी, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

उजनी धरणातून विसर्ग वाढवला

उजनी धरणाची पाणी पातळी वाढली असल्याने या धरणातून रात्री साडेआठनंतर एक लाख ८० हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात सुरुवात करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील अन्य धरणांमधूनही विसर्ग

नीरा देवघर, भाटघर, वीर आणि गुंजवणी या धरणांतून रात्री साडेनऊ वाजल्यानंतर पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. भाटघर धरणातून १४०० क्युसेक, नीरा देवघर धरणामधून ७०० क्युसेक, वीर धरणामधून २३ हजार ७८५ क्युसेक आणि गुंजवणी धरणामधून २०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

वाचा:

पुणे-सोलापूर मार्ग काही वेळ बंद

पुणे-सोलापूर महामार्गावर डाळजजवळ रस्त्यावर पाणी आल्याने काही वेळ रस्ता बंद करण्यात आला होता. अर्ध्या तासानंतर पाणी कमी झाले असून पुन्हा जड वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पावसाचा जोर जास्त असल्यामुळे दोन तीन वस्तीमध्ये पाणी शिरले होते. लोक सुरक्षित आहेत. सर्व गोष्टींवर पोलीस लक्ष ठेऊन आहेत, असे पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी सांगितले.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील काही भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढच्या दोन दिवसांसाठी हा अॅलर्ट आहे.

पुणे शहरात रात्री साडे आठ पर्यंत पडलेला पाऊस (मिलीमीटर मध्ये)
शिवाजीनगर- १९.८
कात्रज- २७
धायरी- २१
वारजे- १९
कोथरूड- १४.५

> रात्री उशिराच्या नोंदीनुसार कात्रज भागात १०० मिमी इतका पाऊस पडला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here