या सामन्यातील अखेरचे षटक हे निर्णायक होते. कारण अखेरच्या षटकात राजस्थानला विजयासाठी २२ धावांची गरज होती. त्याचबरोबर राजस्थानचा युवा धडाकेबाज फलंदाज राहुल तेवातिया हा स्ट्राइकवर होता. दिल्लीकडून अखेरचे षटक हे संघात पहिल्यांदाच संधी मिळालेला तुषार देशपांडे टाकत होता. तुषारच्या २०व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर राहुलने जोरदार फटका लगावला. हा चेंडू आता षटकार जाणार आणि सामन्याचे पारडे राजस्थानच्या बाजूने झुकणार असे वाटत होते. पण यावेळी अजिंक्यची अफलातून कामगिरी पाहायला मिळाली.
राहुलने मारलेला फटका षटकार जाणार असे वाटत होते. पण तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या अजिंक्यने यावेळी दमदार कामगिरी केली. अजिंक्यने सीमारेषेवर जाऊन हा झेल टिपण्याचा प्रयत्न केला. अजिंक्यने हा झेल टिपला, पण आपला तोल जात असल्याचे अजिंक्यला समजले. तोल गेला असता तर अजिंक्य सीमारेषेबाहेर गेला असता आणि राजस्थानला षटकार मिळाला असता. पण अजिंक्यने यावेळी समयसुचकता दाखवली. अजिंक्यने सीमारेषेच्या आतमध्येच असताता हा चेंडू हवेत भिरकावला आणि तो चेंडू मैदानात कसा जाईल, याचीही काळजी घेतली. त्यानंतर अजिंक्य सीमारेषेच्या बाहेर गेला. त्यानंतर लगेगच तो मैदानात परतला आणि थ्रो केला. पण हे सर्व अजिंक्य करत असताना राजस्थानला फक्त एकच धाव घेता आली, कारण त्यांनाही हा षटकार जाईल, असे वाटले होते. पण अजिंक्यने यावेळी नेत्रदीपक कामगिरी करत संघासाठी पाच धावा वाचवल्या. हा षटकातील पहिलाच चेंडू होता. त्यामुळे हा जर षटकार गेला असता तर राजस्थानचे मनोबल उंचावले असते. पण अजिंक्यच्या या कामगिरीमुळे राजस्थानचा संघ पिछाडीवर ढकलला गेला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times