म. टा. खास प्रतिनिधी,

मुंबईच्या रस्त्यावर अनेकदा वाहनचालकांशी पोलिस हुज्जत घालतात आणि सोशल मिडीयावर चित्रफीत अपलोड करून बदनामी केली जाते. त्यामुळे वाहनचालकांशी सौजन्याने बोला. पुरुषांना श्रीमान किंवा सर तर महिलांना श्रीमती किंवा मॅडम असे म्हणा, अशा सूचना मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेचे सहपोलिस आयुक्त यांनी पोलिसांना दिल्या आहेत. कारवाईदरम्यान कुणाशी उद्धट वर्तन केल्याच्या तक्रारी येऊ देऊ नका, असेही त्यांनी बजावले आहे.

सहपोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी नुकतीच मुंबईतील चौक्यातील अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने संवाद साधला. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागात अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या तीन हजार इतकी असून यातील सुमारे अडीच हजार पोलिस रस्त्यावर प्रत्यक्ष कर्तव्य बजावत असतात. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करताना अनेकदा पोलिसांचे त्यांच्याशी खटके उडतात. सध्या तर असा काही प्रकार रस्त्यावर दिसल्यास मोबाइलवरून चित्रित करून व्हिडीओ व्हायरल केला जातो. पोलिसांची चूक नसताना नाहक प्रतिमा मलीन केली जाते. असे प्रकार घडू नयेत यासाठी यादव यांनी पोलिसांना मार्गदर्शन केले.

तरुण असो वा वृद्ध आणि गरीब असो किंवा श्रीमंत कारवाईदरम्यान कुणालाही एकेरी शब्दांत संबोधले जाता कामा नये. नियमाप्रमाणे कारवाई करावी मात्र बोलताना मॅडम किंवा सर असे आदरार्थी शब्द वापरावेत, असे यादव यांनी संवाद साधताना सांगितले.

खासगी वेशात भेट

वाहतुकीचे नियमन करताना किंवा कारवाईदरम्यान कुणी गैरवर्तवणूक करताना लक्षात आल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही सहपोलिस आयुक्तांनी बजावले आहे. विशेष म्हणजे अशा तक्रारी आल्यास खासगी वेशात अचानक भेट दिली जाईल. त्यामुळे सर्वांनी सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि कुणी नियम मोडल्यास कायद्यानुसार त्या चालकावर कारवाई करावी, असे यादव यांनी कर्मचारी आणि अधिकारी यांना सांगितले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here