म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

सुरू झाल्यानंतर इतर कोणत्याही कारणामुळे आलेल्या तापाची धास्ती मुंबईकरांनी घेतली आहे. मागील दोन आठवड्यांपासून उष्मा, पाऊस आणि पहाटे थंडी अशा विचित्र वातावरणामुळे ताप, डोकेदुखी, सर्दी हा त्रासही वाढला आहे. काही रुग्णांमध्ये मलेरियाची लक्षणे दिसत आहेत, तर काहींना संसर्गजन्य तापामुळेही त्रास होत आहे. मात्र हा ताप करोनाचाच असण्याची भीती त्यांच्या मनात आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी मात्र लक्षणे दिसली की करोनाची चाचणी करून घ्या, असा सल्ला दिला आहे.

फिजिशिअन डॉ. अमृत मोरे यांनी सांगितले की, मागील महिन्याच्या तुलनेत तापाच्या ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण थोडे वाढले असले तरी या रुग्णांमध्ये बऱ्याच जणांना करोनाची लागण झाल्याचे दिसत नाही. त्यांना व्हायरल असलेल्या तापाचा त्रास आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या वैद्यकीय चाचण्याही केल्या जातात. योग्यवेळी वैद्यकीय उपचार सुरू केल्यानंतर हा ताप उतरतो. घरामध्ये एका व्यक्तीला ताप आला असेल तर व्हायरल प्रकारच्या तापामध्ये तो दुसऱ्या व्यक्तीलाही येतो. त्यामुळे योग्यवेळी उपचार सुरू करायला हवेत.

पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी हवामानातील बदलामुळे तापाचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र कोणत्याही तापाकडे दुर्लक्ष करू नये, कोविडची चाचणी करून घ्यायला हवी असे मत व्यक्त केले. औषधोपचार, आहार आणि योग्य विश्रांती घेणेही गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या.

धास्तीने घरात राहू नका

मुंबईतील काही सोसायट्यांमध्ये आजही करोनारुग्णांना सहकार्य केले जात नाही. अशा कुटुंबाने घरामध्ये विलगीकरण केले असले तरीही त्यांना महिनाभर घरात राहण्याची सक्ती केली जाते. करोनाच्या धास्तीने भेदरलेल्या कुटुंबाची यासंदर्भात कुणाकडेही तक्रार करण्याची हिंमत होत नाही. असे प्रकार वारंवार घडत असल्यामुळे अनेकजण धास्तीने घरातून बाहेर पडत नाहीत. ताप आला तरीही डॉक्टरांकडून औषध घेऊन घरामध्ये राहतात. मात्र त्यामुळे आजाराची तीव्रता वाढते.

योग्यवेळी निदान गरजेचे

प्रत्येक ताप हा करोनाचाच नसतो, मात्र त्याची वैद्यकीय खातरमजा करायला हवी, हा आग्रह पालिकेकडून सातत्याने व्यक्त केला जात आहे. करोनाच्या चाचण्या आता सर्वत्र उपलब्ध आहेत. तसेच अॅण्टीजेन चाचण्यांचे अहवालही अर्धा तासात येतात. त्यामुळे तापाचे निदान योग्यवेळी होणे गरजेचे असल्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून सातत्याने केले जात आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here