मुंबई: मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री यांना ‘राजकीय’ भाषेत पत्र लिहिणारे राज्यपाल यांच्यावर शिवसेनेनं पुन्हा एकदा तोफ डागली आहे. ‘राज्यपाल पदावरील व्यक्तीने कसे वागू नये ते भगतसिंग कोश्यारी यांनी दाखवून दिलं आहे,’ असा सणसणीत टोला शिवसेनेनं हाणला आहे. ( targets )

मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपनं आंदोलन केल्यानंतर लगेचच कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. ‘राज्यात बार, रेस्टॉरंट सुरू झाली आहेत. मग प्रार्थना स्थळे बंद का? मंदिरे बंद ठेवण्याचे दैवी संकेत आपणास मिळत आहेत का? की तुम्ही अचानक सेक्युलर झाला आहात? असे प्रश्न कोश्यारी यांनी उपस्थित केले होते. कोश्यारी यांच्या राजकीय भाषेतील पत्रावरून प्रचंड गदारोळ सुरू आहे. शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून कोश्यारी यांच्या या भूमिकेचा व भाजपचाही जोरदार समाचार घेतला आहे.

वाचा:

‘कोश्यारी हे कधीकाळी संघाचे प्रचारक किंवा भाजपचे नेते असतीलही; पण आज ते महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्याचे राज्यपाल आहेत याचा त्यांना विसर पडलेला दिसतोय. महाराष्ट्रातील भाजप नेते रोज सकाळीच सरकारच्या बदनामीची मोहीम सुरू करतात हे समजण्यासारखे आहे; पण त्या मोहिमेचा चिखल राज्यपालांनी आपल्या अंगावर का उडवून घ्यावा? भाजपने महाराष्ट्रात सत्ता गमावली ही वेदना मोठी आहे; पण त्यांच्या दुखणाऱ्या पोटावर राज्यपालांनी सारखा लेप लावण्यात अर्थ नाही. हे दुखणं किमान पुढची चार वर्षे राहणारच आहे. पण भाजपचे पोट दुखतेय म्हणून घटनात्मक पदावर विराजमान झालेल्या व्यक्तीलाही बाळंतकळा याव्यात हे गंभीर आहे,’ अशी उपरोधिक टीका शिवसेनेनं केली आहे.

‘मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपालांच्या पत्राला उत्तर देताना महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान, बाणेदारपणा काय असतो ते दाखवून दिले. त्यांनी एकच मारला, पण सॉलिड मारला,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे. ‘राज्यपालांनी या प्रकरणात आ बैल मुझे मार असेच वर्तन केले. पण इथे बैल नसून ‘वाघ’ आहे हे ते विसरले? या सर्व ‘धुलाई’ प्रकरणात भाजपचेही वस्त्रहरण झाले. राज्यपालांचा वापर करून महाराष्ट्र सरकारवर हल्ले करणे त्यांना महागात पडले. या प्रकरणात भाजप व त्यांनी नेमलेले राज्यपाल इतके उघडे पडले आहेत की श्रीकृष्णाने वस्त्रे पुरविली तरी त्यांची अब्रू वाचणार नाही,’ अशी बोचरी टीका शिवसेनेनं केली आहे.

वाचा:

‘भाजपला प्रार्थना स्थळे उघडायचीच असतील तर त्यांनी दिल्लीत जाऊन राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्र्यांना भेटायला हवे व त्याबाबत संपूर्ण देशासाठीच एक राष्ट्रीय धोरण ठरवायला हवे. तेच योग्य ठरेल. मंदिरे किंवा इतर धर्मीयांची प्रार्थना स्थळे का उघडत नाहीत? तुम्ही हिंदुत्वाचा त्याग केला आहे काय? असे प्रश्न विचारणारे पत्र राष्ट्रपती कोविंद यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठवल्याचे दिसत नाही,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

‘राज्यपाल कोश्यारी हे सध्या गोव्याचेही राज्यपाल आहेत. तिथंही मंगेशी, महालक्ष्मी, महालसा अशी सर्व देवस्थाने कुलूपबंदच आहेत. काही छोटी मंदिरे उघडायला तेथे परवानगी देण्यात आली असली तरी मंगेशी, महालसा, महालक्ष्मी, श्री कामाक्षी संस्थान ही मोठी देवस्थाने बंदच आहेत. कामाक्षी देवस्थानचा उत्सवही रद्द करण्यात आला आहे. राज्यपालांची नियत साफ असती तर त्यांनी गोवा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एकाच वेळी पत्र लिहून चिंता व्यक्त केली असती,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

वाचा:

‘भाजपचे लोक राजभवनात जातात व राज्यपालांना भरीस पाडतात. राज्यपाल पदाप्रमाणेच मुख्यमंत्री पदाचीही एक प्रतिष्ठा आहे. राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून ही प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी राज्यपालांवर जास्त आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून राजभवनाची रोज अप्रतिष्ठाच सुरू आहे. ही प्रतिष्ठा राखण्यासाठी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा हे राज्यपालांना माघारी बोलवतील,’ अशी अपेक्षाही शिवसेनेनं व्यक्त केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here